पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

229

गोतस्करीच्या संशयावरून कथित गोरक्षकांच्या मारहाणीत राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील पहलू खान याचा मृत्यू झाला होता. झुंडबळीच्या या प्रकरणातील सहा आरोपींची अलवर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पहलू खान यांचा मुलगा इरशादने म्हटले आहे.

हरयाणातील नूह जिल्ह्यात पहलू खान याचे गाव असून त्या ठिकाणी राजस्थानमधील अलवर येथून गाई पाठविल्या जात होत्या. गाईंची वाहतूक करणार्‍या पहलू खान आणि त्यांच्या दोन मुलांना कथित गोरक्षकांनी रोखले व लोखंडी रॉड तसेच काठय़ांनी बेदम मारहाण केली होती. एप्रिल 2017 मध्ये घडलेल्या या घटनेत पहलू खान यांचा मृत्यू झाला. झुंडबळीच्या या प्रकरणाचे तीक्र पडसाद देशभर उमटल्यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

अलवर जिल्हा न्यायालयात 7 ऑगस्टपासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या सुनावणीदरम्यान 47 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पहलू खानच्या दोन मुलांचीही साक्ष घेण्यात आली. या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी न्यायमूर्ती सरिता स्वामी यांनी सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयात घटनेचा व्हिडीओ सादर करण्यात आला होता, मात्र तो व्हिडीओ पुरावा म्हणून पुरेसा नसल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले. या प्रकरणातील तीन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरोधात बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या