
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून प्रवेश संपेपर्यंतची सर्व माहिती लवकरच अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. कॉलेजांची एकूण संख्या, प्रवेश क्षमता, व्यवस्थापन स्तरावरील प्रवेशाच्या जागा, प्रत्येक फेरीत झालेले प्रवेश, कॉलेजनिहाय शिल्लक जागा याचा तपशील सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
वर्ष 2013-14 पासून सिस्कॉम संघटनेच्या वतीने अकरावी ऑनलाइन प्रवेशासंबंधी माहितीची शालेय शिक्षण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागणी करण्यात येत आहे. मात्र आजतागत शिक्षण विभागाकडून कोणताच प्रतिसाद संघटनेला मिळालेला नाही. अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर कॉलेजमधील रिक्त जागा आणि कटऑफ सोडून इतर कोणतीही माहिती अस्तित्वात नाही. यंदा तरी अकरावी प्रवेशासंबंधी सर्व माहिती उपलब्घ व्हावी, यासाठी सिस्कॉम संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शालेय शिक्षण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली तरीदेखील माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट राज्य माहिती आयोगाकडे शिक्षण विभागाविरोधात लेखी तक्रार करत माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱया अकरावी ऑनलाइन राज्य प्रवेश समितीवर कारवाई करण्याची मागणी केली.
अकरावी प्रवेशासंबंधी मागविलेली माहिती
- कॉलेजचे नाव, एकूण प्रवेश क्षमता, व्यवस्थापन स्तरावरील प्रवेश
- प्रत्येक फेरीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले प्राधान्यक्रम
- प्रवेशफेरीसाठी महाविद्यालयांना पाठविलेल्या याद्या
- व्यवस्थापन स्तरावरून झालेले प्रवेश
- व्यवस्थापन कोटय़ातील रिक्त जागा
- प्रत्यार्प्रित केलेल्या जागांचा तपशील, कोटय़ाचे नाव, कॉलेजचे नाव
माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश समिती पहिल्या प्रवेश फेरीपासून कॉलेजना पाठविलेल्या याद्या, कॉलेजनिहाय प्रत्यक्ष झालेले प्रवेश, प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, प्रवेशासासाठी आलेले अर्ज अशी सर्व माहिती जनतेला पाहण्यासाठी कायमस्वरूपी वेबसाईटवर जाहीर करणार आहे.
-वैशाली बाफना, अध्यक्ष सिस्कॉम, पुणे























































