मतदार याद्यांतील घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या! सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशी आयोगाला घेरले, भाजपचे कार्यकर्ते मतदार याद्यांबरोबर खेळताहेत… पुरावेच समोर ठेवले!

लोकशाहीचे बळकटीकरण आणि पारदर्शक निवडणुकांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दुसऱया दिवशी निवडणूक आयोगाला घेरले. राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयावर धडक देत शिष्टमंडळाने मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाचे आणि सत्ताधारी भाजपच्या हस्तक्षेपाचे पुरावेच आयुक्तांसमोर ठेवले. मतदार याद्यांमध्ये असलेल्या त्रुटींबाबत केंद्र सरकारचे प्रतिनिधी असलेले मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त या दोघांनीही जबाबदारी झटकल्याने शिष्टमंडळातील नेते संतप्त झाले. निवडणूक आयोग सत्ताधाऱयांसाठी काम करतोय का, असा सवाल त्यांनी विचारला. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मतदार याद्यांमधील घोळ दूर केले जात नाहीत, दुरुस्ती होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी मतदार याद्यांमधील त्रुटी आधी दूर व्हायला हव्यात, अशी प्रमुख मागणी घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज सकाळी मंत्रालयासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना भेटले. या शिष्टमंडळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, अजित नवले आदींचा समावेश होता. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना महत्त्वाचे पुरावेही प्रसारमाध्यमांसमोर सादर केले.

यादीचे पुनर्विलोकन का नाही?

जुलैला राज्य आयोगाला यादी दिली गेली, पण तत्पूर्वीच्या सहा-सात महिन्यांत यादीचे काहीच पुनर्विलोकन का करण्यात आले नाही? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. निकोप निवडणुका हा लोकशाहीचा पाया आहे. सदोष यादी वापरणार म्हणजे आगामी निवडणूक निकोप होणार नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाणे अयोग्य आहे, असे थोरात म्हणाले.

घर क्रमांक 0… एका घरात 889 मतदार!

नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या मतदाराचे नाव वेगवेगळ्या आयडीमध्ये सहा वेळा दाखवले गेले होते. 12 ऑगस्टला ती बातमी मीडियात झळकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तपासणी केल्यावर ते खरे असल्याचे दिसून आले. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता ती नावे यादीतून गायब झाली. कुणी तक्रार केली, कुणी स्थळ पाहणी केली याबाबत आयुक्तांनाही माहिती नाही. यावर जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.

  • उमेदवारांनी मतदानासंदर्भात माहिती मागूनही आयोगाकडून ती दिली जात नाही. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही कोरेगाव मतदारसंघातील 200 नावे आयोगाने मतदार यादीत घेतली नाहीत.
  • मुरबाड मतदारसंघात बूथ क्रमांक 8 येथे 400 मतदारांचा घर क्रमांक शून्य आहे. बडनेरा मतदारसंघात बूथ क्रमांक 211 मध्ये 450 मतदारांचा, तर कामटी मतदारसंघात बूथ क्रमांक 50 मध्ये 867 मतदारांचा घर क्रमांक शून्य दाखवला गेला आहे.
  • नाशिकमध्ये मतदारसंघात 3829 क्रमांकाच्या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे, तर पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात घर क्रमांक 226 मध्ये 889 मतदारांची नोंद आहे.
  • मतदानाच्या दिवशी दर एका तासाला झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली जाते; पण 2024 च्या विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 नंतर मतदान संपल्यावर जाहीर केली गेली. त्यात घोळ घातला गेला. त्याच विधानसभेच्या मतदार याद्या पुढे चालू ठेवल्या तर पुन्हा तसाच घोळ होण्याची भीती आहे. त्यामुळे ताबडतोबीने मतदार याद्या दुरुस्त करा.
  • शिरूर मतदारसंघात एका घरात 188 मतदार दाखवले गेले होते, पण ते घरच गावात नव्हते. त्याबाबत अशोक पवार यांनी आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने ती मतदारांची खासगी बाब असल्याचे सांगून माहिती दिली नाही. आयोगाच्या कायद्यानुसार उमेदवारांनी मागितलेली माहिती देणे बंधनकारक आहे.
  • आयोगाने आठ दिवस दिले आहेत. पण हा घोटाळा प्रचंड असल्याने मतदार याद्यांमधील सर्व चुका शोधून आयोगाला द्यायला किमान एक महिना लागेल. आतापर्यंतच्या चुका काढण्यासाठी तीन महिने लागले. प्रत्येक मतदारसंघात हे काम सुरू आहे. डुप्लिकेट नावे काढायला पूर्वी सॉफ्टवेअर वापरले जायचे ते आता का वापरले जात नाही.
  • आमच्या प्रश्नांना आणि आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. भाजपच्या प्रवक्त्यांनी देऊ नये.

आयोगाचा सर्व्हर दुसराच चालवतोय – जयंत पाटील

राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसराच चालवतोय. कुणीतरी बाहेरची व्यक्ती सर्व सिस्टम ऑपरेट करत आहे. निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिलेली नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी नालासोपाऱ्यातील सुषमा गुप्ता या मतदाराचा दाखला दिला.

भलतेच लोक याद्या हाताळताहेत! – बाळासाहेब थोरात

ऑनलाईन पद्धतीने दुसरेच याद्या हाताळत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. मतदार याद्यांमध्ये दोष असल्याचे सांगूनही मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे काहीच उत्तर आलेले नाही. राज्याबाहेरून, देशाबाहेरून महाराष्ट्रात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांची नावेही मतदार यादीमध्ये आहेत, असे थोरात म्हणाले.

राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवत नाहीत, इथेच घोळ आहे – राज ठाकरे

निवडणूक म्हटले की, राजकीय पक्ष आले, मतदार आले. निवडणूक आयोग निवडणुका घेतो आणि राजकीय पक्ष निवडणुका लढतात. राजकीय पक्षांनाच मतदार यादी दाखवली जात नसेल तर खरा घोळ इथेच आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

वेबसाईटवरून मतदार याद्या गायब झाल्या तेसुद्धा निवडणूक आयुक्तांना माहीत नाही. मग हे कोण गायब करतेय आणि नव्याने घालतेय?

मतदान गोपनीय असते, मतदार नाही. मतदान केंद्रातील फुटेज अधिकारी पाहू शकतात, मग आम्ही का नाही? निवडणुका आम्ही लढतो. आयोग ही लपाछपी का करतेय?

देवांग दवेवर संशय!

भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांना निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मतदार याद्यांमधील घोळामागे दवे हेच असावेत असा आमचा गोड समज आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूरच्या राजोरा मतदारसंघात मतदार यादीतील अफरातफर आम्ही पुराव्यासह पकडून दिल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रचंड हेराफेरी

मतदार याद्यांमध्ये प्रचंड हेराफेरी आहे. मतदारांचे पत्ते, घर क्रमांक चुकीचे आहेत. संबंधित पत्त्यांवर राहत नसलेल्या व्यक्तीचेही मतदार यादीत नाव आहे. ‘सोयीची’ नावे हिरव्या पेनाने मार्क करून तर ‘गैरसोयीची’ लाल पेनाने मार्क करून वगळण्याचे आदेश वरून दिले गेले आणि नावे वगळली गेली. यासंदर्भात दिलेल्या तक्रारीही आयोगाने बासनात गुंडाळल्या, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पुरावेच दिले.