भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह सर्व पक्षीय मेहकर बंद, ठिकठिकाणी श्रध्दांजली

34

सामना प्रतिनिधी । मेहकर (बुलढाणा)

पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांनी मेहकर बंदचे आवाहन करीत शहरातून शोक रॅली काढली, तर शुक्रवारी व शनिवारी ठिकठिकाणी श्रध्दांजली वाहण्यात आली.

आज सकाळी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र आले व शहरातून शोक रॅली काढली. शहरातील व्यापार्‍यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. सरकारी कार्यालयात यामुळे शुकशुकाट होता. शिक्षण संस्था बंद होत्या. सर्व पक्षीय रॅली शिवाजी उद्यान मध्ये आल्यावर तिथे सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते गजानन तात्या कृपाळ यांनी चोरपांग्रा येथील शहीद राठोड यांच्या परिवारास पन्नास हजार रुपये मदत देणार असल्याचे जाहीर केले. तसेच नगराध्यक्ष कासमभाई गवळी व उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया सर्व नगरसेवक यांनी जाहीर केले की, शहरातील आजी माजी सैनिक, शहीद परिवार यांना मालमत्ता व पाणीपट्टी कर माफ करावा असा ठराव जिल्हाधिकारी बुलढाणाकडे पाठवू. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सह नागरिक हजर होते. ठिकठिकाणी श्रध्दांजली या घटनेतील शहिदांना शिवसेना कार्यालय, एस टी आगार, श्रीमती सिंधुताई जाधव महिला महाविद्यालय, स्व. दत्तात्रय पायघन सार्वजनिक वाचनालयासह ठिकठिकाणी श्रध्दांजली वाहण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या