आयसीसीने हे काय केलं? कसोटीतील सर्व फलंदाज झाले नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कसोटी क्रिकेटमध्ये जो फलंदाज इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करतो त्याला क्रमवारीत पहिला नंबर मिळतो आणि इतरांना त्याच क्रमाणे नंबर असतात. परंतु मंगळवारी आयसीसीने सर्वच कसोटी फलंदाजांना नंबर एक करून टाकले. या प्रकाराने अनेक जण गोंधळलेही. परंतु आयीसीसीने फक्त थोड्या काळासाठी हे केले होते. अमेरिकेतील पॉप गायक आणि रॅपर कान्ये वेस्टला उत्तर देताना आयसीसीने ही मजेशीर कामगिरी केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी पॉप गायक आणि रॅपर कान्ये वेस्टने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कोणीही कोणापेक्षा मोठं नाही, अशा अर्थाचे ट्विट केले होते. याच ट्वीटला उत्तर देताना आयसीसीने दोन फोटो ट्वीट केले आहेत. यातील पहिल्या फोटोत कान्येच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट आणि दुसऱ्या फोटोत सर्व फलंदाजांना क्रमवारीत पहिला नंबर दिल्याचा स्क्रीनशॉट टाकला आहे. काही वेळानंतर आयसीसीने हे आकडे पुन्हा बदलून पहिल्याप्रमाणे केले. परंतु काही काळासाठी की होईना सर्व फलंदाजांना आपण आयसीसी क्रमवारीत नंबर एक झाल्याचा आनंद मिळाला.

आयसीसीच्या या ट्वीटला अनेकांनी मजेशीर उत्तरं दिले आहेत. नेटकऱ्यांनी आयसीसीच्या सोशल मीडिया टीमचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी हे सर्व हसण्यावारी नेले आहे.