अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची बाजी कोण मारणार; 35 वर्षांपासून अचूक भविष्य वर्तवणाऱ्याचे ‘हे’ भाकीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेमध्ये राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. कोरोना संकट हाताळण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर जो बिडेन यांचा विजय म्हणजे चीनचा विजय असा आरोप ट्रम्प यांच्याकडून होत आहे. कोरोना संकटामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अमेरिकेच्या निवडणुकीबाबत 35 वर्षांपासून अचूक भविष्यावणी करणाऱ्या व्यक्तीने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे भाकीत केले आहे. एलन लिचमेन असे त्या व्यक्तीचे नाव असून 35 वर्षांपासून त्यांचे भाकीत अचूक ठरत आहे.

एलन यांनी 1984 पासून निवडणुकीबाबतची केलेली भाकीते अचूक ठरली आहेत. ते इतिहासाचे प्रोफेसर आहेत. या निवडणुकीत जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरस असल्याने एलन यांनी केलेले भाकीत खरे ठरणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबतचे भाकीत वर्तवण्यासाठी एलन यांनी स्वतःची पद्धत विकसीत केली आहे. त्यांनी तयार केलेल्या 13 प्रश्नांपैकी सकारात्मक उत्तरे जास्त असल्यास विद्यमान अध्यक्षच पुन्हा निवडणून येतो. तर नकारात्मक उत्तरे जास्त असल्यास विद्यमान अध्यक्ष पुन्हा निवडून येत नाही.

आपण तयार केलेल्या पद्धतीत 7 प्रश्नांची उत्तर नकारात्मक आली आहेत. तर 6 प्रश्नांची उत्तर सकारात्मक आली आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची असणार आहे. या पद्धतीनुसार नकारात्मक उत्तरे जास्त असल्याने डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपती होण्याची शक्यता कमी असल्याचे भाकीत एलन यांनी वर्तवले आहे. त्यांचे ह भाकीत खरे ठरल्यास 1992 नंतर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून न येणारे अध्यक्ष ते ठरणार आहेत. कोरोनातून बरे झाल्यावर ट्रम्प यांनी पुन्हा प्रचाराला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्या प्रचार सभांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भिती व्यक्त होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक कोटी अमेरिकन नागरिकांनी मतदान केले आहे. कोरोना संकटामुळे नियोजित तारखेपूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. 35 वर्षांपासून राष्ट्राध्यक्षपदाचे अचूक भाकीत वर्तवणाऱ्या एलन लिचमेन यांचे यंदाचे भाकीतही अचूक ठरते काय, याचे उत्तर पुढच्या महिन्यात मिळणार आहे.