
काँग्रेसला जागावाटपाबाबत दिलेल्या प्रस्तावाचे उत्तर अद्यापही आम्हाला मिळालेले नाही. काँग्रेस फक्त आम्हाला खेळवत आहे. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेससोबत युती करण्याची आमची इच्छा नाही. एमआयएमसोबत आमची युती अद्यापही कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही युती घडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज स्पष्ट केले.
दादर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेससोबत आता युती करण्याच्या भूमिकेत आम्ही नसल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेच्या आधीदेखील काँग्रेस नेतृत्वाने आम्हाला खेळवत ठेवले. त्यानंतर आम्ही स्वतंत्र लढून आमची ताकद त्यांना दाखवली. आतादेखील त्यांना भाजपला भीती दाखवण्यासाठीच आमचा उपयोग करायचा आहे. आम्ही आतादेखील प्रस्ताव दिला होता. त्याबाबतचे उत्तर अद्यापही काँग्रेसकडून आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसचा विचार आम्ही सोडून दिला असल्याचे ते म्हणाले.
खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा केली असल्याचे विचारले असता ते म्हणाले, माझी असदुद्दीन ओवेसी यांच्याशी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे इतर कोण काय बोलते याला महत्त्व नाही. एमआयएमसोबत आमची युती अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत युती घडवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे. ओवेसी यांनी त्यांची यादी माझ्याकडे पाठवली आहे. मात्र वंचित एकूण किती जागा लढणार, एमआयएमला किती जागा सोडणार याचे मात्र उत्तर आंबेडकर यांनी दिले नाही.
‘वंचित’चा रिमोट ‘आरएसएस’च्या हातात; इम्तियाज जलील यांचा आरोप
‘आरएसएस’च्या नेत्याने ‘वंचित’ नेत्यांचे कान फुंकल्यानेच मला व्हीलन ठरविण्याचा प्रयत्न सुरू असून एमआयएमची महाराष्ट्रात मोठी ताकद असताना फक्त आठ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कारण ‘वंचित’चा रिमोट ‘आरएसएस’च्या हातात आहे असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केला. कंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्या आघाडीत बिघाडी झाली असली तरी कंचित बहुजन आघाडीसोबत अजूनही चर्चेची दारे खुली असल्याचे संकेतदेखील जलील यांनी दिले. दरम्यान, उद्यापासून राज्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

























































