टिळक पुलावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था, वाहतूक पोलिसांचा अध्यादेश जारी

एल्फिन्स्टन पूल बंद केल्यानंतर टिळक पुलावरून वाहतूक वळविण्यात आल्याने त्या पुलावरील वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. नागरिकांचे हाल होत असल्याने वाहतूक पोलीस विभागाने पुलावर वाहतूककोंडी होऊ नये याकरिता एक पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.

टिळक पुलावर वाहतुकीचा बोजवारा उडू नये याकरिता वाहतूक पोलिसांनी आजपासून सकाळी 7 ते रात्रौ 11 या वेळेत टिळक पुलावरून दादर टर्मिनसकडे जाणाऱ्या वाहनांकरिता कोतवाल गार्डन, वनमाळी चौक, टिळक पूल रॅम्प आणि पुढे टिळक टर्मिनसकडे जाता येणार आहे. तर दादर टर्मिनसवरून बाहेर जाणाऱ्या वाहनांकरिता रेल्वे फलाट क्रमांक 7 गेट-कमला रामण वसाहत-रेल्वे कर्मचारी वसाहत गेट (कॅनरा बँक) कटारिया मार्गाने डावे वळण घेऊन माहीम किंवा शीवकडे तसेच इच्छित स्थळी जाण्यासाठी वापर करता येणार आहे. त्याचबरोबर सदरची वाहने कोणत्याही परिस्थितीत विहित वेळेपूर्वी टिळक पुलाच्या दिशेने येणार नाहीत असा अध्यादेश वाहतूक पोलिसांनी जारी केला आहे.

सर भालचंद्र मार्ग एक महिन्यासाठी वाहतुकीला बंद

वाहतूककोंडी व आपत्कालीन वाहनांना प्रवेश करण्यास होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याकरिता सर भालचंद्र मार्ग, दादर पूर्व (प्रीतम हॉटेल) ते टिळक उड्डाणपुलाकडे युरोनियन बंगलो, दादरपर्यंत असा वाहतुकीस 18 सप्टेंबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सदर परिसरातील वाहतूक व रहदारी सुरळीत व सुरक्षितपणे सुरू राहण्याकरिता बी. ए. रोड दादर (पू.) व दादर रेल्वे स्टेशन (पू.) कडून सर भालचंद्र मार्ग, दादर (पू.) या रस्त्यावरून टिळक उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या वाहनांकरिता ज्ञानजीवनदास मार्गाने ब्रॉडवे जंक्शन येथून डावे वळण घेऊन डॉ. बी. ए. मार्गावरून दादर टीटी सर्कल, टिळक उड्डाणपूल असा पर्यायी मार्ग असणार आहे. शिवाय टिळक रोड नं. 1 येथून सर भालचंद्र मार्ग, दादर पूर्व मार्गावरून टिळक उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांकरिता ज्ञानजीवनदास मार्गाने ब्रॉडवे जंक्शन येथून डावे वळण घेऊन डॉ. बी. ए. मार्गावरून दादर टीटी सर्कल, टिळक उड्डाणपूल असे जाता येणार आहे.