
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेच्या 33 वर्षांच्या अखंड यशस्वी वाटचालीत आघाडीचा ठाणेकर बॅडमिंटनपटू अमन फारोघ संजय याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बेनिन या आफ्रिकन देशामध्ये झालेल्या प्युचर सीरिज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्याने रविवारी एकेरीचे अजिंक्यपद खेचून आणताना कझाकिस्तानच्या डीमिट्री पनारिनचा अंतिम फेरीत सरळ गेम्समध्ये पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरले.
दरम्यान, अमनने याआधी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या अनुक्रमे रॉबर्ट समर्स, रॉबर्ट व्हाईट यांचा 21-18,21-12 व 21-18,21-16 आशा गुणांमध्ये पाडाव करीत अंतिम फेरी गाठली होती. अमन वयाच्या आठव्या वर्षापासून म्हणजे गेली 13 वर्षे ठाणे महापालिकेच्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड व सर्व ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने 2018 साली केनिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते व ‘खेलो इंडिया’अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकेरीचे सुवर्णपदकही मिळवले होते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानी बॅडमिंटन संघटनेच्या 19 वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय क्रमवारीत तो अव्वल क्रमांकावर होता. बेनिन येथील आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा संपवून अमन आता परस्पर लॅटविया (येथील युरोप) पुढील स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी निघाला आहे.

























































