तरूण पिढीपर्यंत भाऊसाहेबांचे विचार पोहोचवावेत – बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी आजच्या तरूण पिढीपर्यंत भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 121 व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख सायन्स इनोव्हेटिव अॅक्टिव्हिटी सेंटरचे उदघाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते यावेळी झाले. संशोधनाला चालना मिळण्यासाठी संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे अडीच कोटी खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे.

महसूल मंत्री थोरात म्हणाले की, गत शतकातील सन 1900 ते 1950 हा कालखंड विविध अंगांनी घडलेला आहे. दोन महायुद्धे, कम्युनिस्ट क्रांती, महात्मा गांधींची चळवळ अशा अनेक महत्वपूर्ण घटना जगभरात याच कालखंडात झाल्या. याच कालखंडात अमरावतीच्या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अशी महनीय व्यक्तिमत्वे घडली. आधुनिक व पुरोगामी समाजाची पायाभरणी त्यांनी केली. भाऊसाहेब हे घटना समितीचेही सदस्य होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यात त्यांचा सहभाग होता. संविधानाच्या प्रास्ताविकेत लोकशाही मूल्यांचे सार आहे. संतांच्या विश्वव्यापी करूणेचे परिमाण या प्रास्ताविकेला लाभले आहे. लोकशाहीच्या या मूल्यांचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे भाऊसाहेबांसारख्या आधुनिक व पुरोगामी समाजाची पायाभरणी करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे विचार तरूणांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाला जगभरातून मान्यवर आले होते. त्यानिमित्त जगभरातील कृषी तंत्रज्ञान त्यांनी देशातील शेतकरी बांधवांपुढे आणले. या घटनेच्या गौरवार्थ शिवाजी शिक्षण संस्थेच्या नियोजित उपक्रमाला शासन निश्चित सहकार्य करेल.