यंदा अमावास्येलाच दिवाळी पाडवा!

या वर्षी आश्विन अमावस्येलाच दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा आहे. याआधी 2005 मध्ये असा योग आला होता. तसेच यानंतर 2029 मध्येही असा योग येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले की, या वर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी आली आहे. जी तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी नसते तिला ‘क्षयतिथी’ म्हणतात. या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी आश्विन अमावस्या संपल्यानंतर त्याच दिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करावयाचा आहे. सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी आश्विन अमावस्या संपल्यानंतर विरोधीकृत विक्रम संवत 2076 व महावीर जैन संवत  2546  चा प्रारंभ होत आहे. यानंतर 2029 मध्येही पुन्हा अशीच कार्तिक शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

धनत्रयोदशी : शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाली त्रयोदशी असल्याने गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी त्याच दिवशी साजरी करावयाची आहे. या दिवशी व्यापारी मुहूर्तावर नवीन वर्षाच्या हिशेबाच्या वह्या आणतात. शुक्रवारी सकाळी 6.37

वाजल्यापासून सकाळी 10.55 पर्यंत, दुपारी 12.21 ते 1.47 आणि सायंकाळी 4.39 ते 6.08 या मुहूर्तावर हिशेबाच्या वह्या आणाव्यात.

नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर रोजी चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी व त्याच दिवशी प्रदोषकाली आश्विन अमावस्या असल्याने रविवार, 27 ऑक्टोबरच्याच दिवशी नरक चतुर्दशी  व लक्ष्मीकुबेर पूजन येत आहे. त्या दिवशी सायंकाळी  6.07 पासून रात्री 8.37 पर्यंत लक्ष्मीपूजन करायचे आहे.
बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी आश्विन अमावस्या संपल्यावर बलिप्रतिपदेचा म्हणजेच दिवाळी पाडव्याचा सण साजरा करावयाचा आहे. त्याच दिवशी व्यापारी लोकांसाठी वहीलेखनाचा शुभमुहूर्त सकाळी 9.31 ते 10.56, दुपारी 1.48 ते 6.07 वाजेपर्यंत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या