
ऍमेझॉन समूहाचे संस्थापक जेफ बोजेस हे हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी हिंदुस्थानात दाखल होताच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. नवी दिल्लीत होणाऱ्या ऍमेझॉनच्या ‘संभव’ या वार्षिक महोत्सवात ते हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी देशभरातील लघुउद्योजक 300 शहरांत ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत.
बोजेस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱयाचा निषेध करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ही देशपातळीवरील संघटना बुधवारी ‘राष्ट्रीय निदर्शने दिवस’ पाळणार आहे. 7 कोटींहून व्यापारी आणि 40 हजार व्यापारी संघटनांची ही शिखर संस्था आहे. त्यामुळे बोजेस यांच्या हिंदुस्थान दौऱयाला देशभरातून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. ऍमेझॉन समूह ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सवलतींचे आकर्षण दाखवत आहे. याचा गंभीर फटका देशातील लघु उद्योजकांच्या व्यवसायावर बसल्याचा दावा सीएआयटीने केला आहे.

























































