
>> पराग पोतदार
मानवनिर्मित विविध कारणांमुळे पृथ्वीचे ‘फुप्फुस’ म्हटल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे असेच सुरू राहिले तर 2050 सालापर्यंत अॅमेझॉन जंगल दुर्धर अशा पर्यावरणीय संकटात सापडू शकते, असा धोक्याचा इशारा अभ्यासकांकडून दिला जातो आहे. जंगलाची नैसर्गिक रचना एकदा बदलली की त्याचा मोठा भाग कोरडाठाक बनू शकतो. जगाचे हे फुप्फुस उत्कृष्ट रीतीने कार्यरत राहणे ही भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि दुर्लक्ष करता न येण्यासारखी बाब आहे.
पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्षावन असणाऱ्या अॅमेझॉनला ’जगाचे फुप्फुस’ म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात मोठे असे हे वर्षावन पृथ्वीवरील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर एकट्याने तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्याने पृथ्वीवरील हवामान बदलाचा वेग कमी होण्यास त्याची मोठी मदत मिळते. हे जगाचे फुप्फुस आजच्या घडीला विविध कारणांमुळे धोक्यात येत आहे, असा गंभीर इशारा अभ्यासकांनी दिला आहे.
मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड आणि हवामान बदलाचे होत असलेले गंभीर परिणाम या दोन गोष्टी त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. सातत्याने लागणाऱ्या आणि लावल्या जाणाऱ्या आगींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे नुकसान होते आहे. अॅमेझॉनची जंगले ही दलदल आणि गवताळ प्रवेशाने व्यापलेली आहेत. या जंगलांमध्ये जैवविविधतादेखील प्रचंड आहे. 40 हजार प्रकारच्या वनस्पती या जंगलात असल्याचा दावा अभ्यासक करतात. त्यामध्ये अनेक दुर्मिळ आणि फक्त अॅमेझॉनच्या जंगलातच सापडतील अशाही वनस्पतींचा समावेश आहे. येथे सस्तन प्राण्यांच्या 525 हून अधिक प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 375 हून अधिक प्रजातींचा समावेश आहे. तसेच सुमारे तीन हजारांहून अधिक माशांचे प्रकार येथे आहेत. त्यामुळे अॅमेझॉनचे जंगल म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्थाच आहे असे मानले जाते.
शेकडो प्रकारच्या स्थानिक समुदायांचे हे आश्रयस्थान आहे. जगातील सर्वात मोठी अॅमेझॉन नदीसुद्धा इथूनच वाहते आणि या नदीच्या तब्बल 11 उपनद्या आहेत. गोड्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोतदेखील येथेच आहे. हे पाणी पुढे अटलांटिक समुद्राला मिळते. मात्र, अॅमेझॉनच्या या जंगलातून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाढत असल्याचे आता दिसून येत असल्याने अभ्यासकांच्या चिंतेत भर पडली आहे. जंगलांची तोड, जमिनीचा ऱ्हास या गोष्टी जशा त्याला कारणीभूत आहेत त्याचप्रमाणे तापमानातील वाढ, दीर्घकाळ सुरू असलेला दुष्काळ आणि जंगलात सतत पेटत असलेले वणवे हेदेखील अॅमेझॉनच्या समृद्धतेला व संपन्नतेला बाधा आणत आहेत. एरवी हिरवेगार असणारे हे जंगल आता अनेक ठिकाणी कोरडे पडत चालले असून त्याचे अनेक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.
वृक्षतोडीची गंभीर समस्या
अॅमेझॉनच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड हा केवळ पर्यावरणाचाच नाही, तर संपूर्ण पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि हवामानाचा अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे. दक्षिण अमेरिकेतील नऊ देशांमध्ये पसरलेले अॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल आहे. ‘पृथ्वीचे फुप्फुस’ म्हणून ओळखले जाणारे हे जंगल ऑक्सिजनची निर्मिती, कार्बनचे उत्सर्जन, जलचक्र संतुलन आणि लाखो प्रजातींचा निवास यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत वृक्षतोडीच्या समस्येने इथे अनेक गंभीर प्रश्न निर्माण केलेले आहेत.
अॅमेझॉनमधील जंगलतोडीचे मुख्य कारण म्हणजे कृषिविस्तार. सोयाबीन, ऊस आणि इतर खाद्यपिकांच्या उत्पादनासाठी या भागात शेती केली जाते. त्या शेतीसाठी जमीन मिळावी म्हणून वृक्षतोड केली जाते. तसेच गाई-म्हशींना चरायला जागा मिळावी म्हणूनदेखील वनक्षेत्रे साफ केली जातात. ब्राझीलमध्ये मांसनिर्मिती उद्योगात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे पशुपालनाकडे लोकांचा कल वाढतो आहे. जनावरे बाळगण्यासाठी आणि चारण्यासाठी जी जागा लागते ती वृक्षतोड करून मिळवली जाते. बेकायदेशीर लाकूडतोड हीदेखील एक मोठी समस्या आहे. जंगलात झाडांची समृद्धता असल्याकारणाने तेथील महागडी झाडे अवैध मार्गाने तोडून त्यांची तस्करी केली जाते. नियमबाह्य पद्धतीने होणारी ही वृक्षतोड हे पर्यावरणाचे नुकसान होण्याचे मुख्य कारण मानले जाते.
पृथ्वीवर ज्ञात असलेल्या एकूण प्रजातींपैकी 10 टक्के प्रजाती एकट्या अॅमेझॉनच्या जंगलात आहेत, असा अभ्यासकांचा सांगावा आहे. परंतु गेल्या काही वर्षांत वाढत्या वृक्षतोडीचे परिणाम या जंगलातही दिसून येऊ लागले आहेत. हवामान बदलाचे परिणाम येथेदेखील जाणवू लागले आहेत. वाढत्या वृक्षतोडीमुळे कार्बनडॉयऑक्साईडचे उत्सर्जन वाढते, एकूण दैनंदिन तापमानात वाढ होते, जागतिक हवामानाचे चक्र असंतुलित होते. वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान बदलते आणि कालांतराने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ लागते. हा परिणाम अलीकडच्या काळातील आकडेवारीवरून समोर आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वृक्षतोडीची समस्या गंभीर बनली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यावर प्रभावी असा तोडगा काढणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे खाणकाम करणारी माणसे आणि बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करणारे तस्कर यांच्यावर कडक निर्बंध जारी करणे गरजेचे बनले आहे.
ज्याप्रमाणे वृक्षतोड ही एक गंभीर समस्या आहे त्याचप्रमाणे जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी हेसुद्धा जंगल नष्ट होण्याचे प्रमुख कारण मानले जाते आहे. 2024 साली अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये आग लागण्याची 1लाख 40 हजार ठिकाणे निदर्शनास आलेली होती. 2023 सालच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. 2007 सालानंतर हे सर्वाधिक प्रमाण वाढल्याचे अभ्यासकांच्या लक्षात आले आहे. 2024 सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगीत नष्ट झालेले वनक्षेत्र 6 लाख 85 हजार हेक्टर इतके होते. 2023च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 132 टक्क्यांहून जास्त आहे. या आगींमध्ये केवळ जंगलच नाही, तर कृषिक्षेत्राचेही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे. Greenpeace या संस्थेने यासंदर्भात एक अहवाल प्रकाशित केलेला असून त्यानुसार, 2024 साली अॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगींचे प्रमाण अलीकडच्या काळातील सर्व वर्षांतील आगीच्या तुलनेत सर्वाधिक होते. अशा आगींमुळे जंगले ताबडतोब नष्ट होत नाहीत; परंतु जंगलातील जमिनींची गुणवत्ता घसरते. तसेच स्थानिक जनजाती, वन्यजीवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. वनातील एकूणच परिसंस्था यातून धोक्यात येऊ शकते अशी भीती अभ्यासक वर्तवतात.
मानवनिर्मित विविध कारणांमुळे पृथ्वीचे ‘फुप्फुस’ म्हटल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे असेच सुरू राहिले तर 2050 सालापर्यंत अॅमेझॉन जंगल दुर्धर अशा पर्यावरणीय संकटात सापडू शकते, असा धोक्याचा इशारा अभ्यासकांकडून दिला जातो आहे. जंगलाची नैसर्गिक रचना एकदा बदलली की त्याचा मोठा भाग कोरडाठाक बनू शकतो. जगाचे हे फुप्फुस उत्कृष्ट रीतीने कार्यरत राहणे ही भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आणि दुर्लक्ष करता न येण्यासारखी बाब आहे.
(लेखक वरिष्ठ पत्रकार आणि अनुवादक आहेत)






























































