
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 10 टक्के कपात करणार आहे. अॅमेझॉन कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार असून कंपनीच्या या निर्णयाचा फटका 30 हजार कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कंपनी लवकरच एका ई-मेलद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना कपातीची माहिती देणार आहे. ओव्हरहायरिंगची भरपाई करण्यासाठी आणि कामकाज सुलभ करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे, असे सांगितले जात आहे.
जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेली अॅमेझॉन कंपनीकडे सध्या 15 लाख कर्मचारी असून त्यात 3 लाख 50 हजार पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका आकडेवारीनुसार, अॅमेझॉनने 2022 पासून अवघ्या चार वर्षांत जवळपास 27 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात वेगवेगळ्या टप्प्यात केली आहे, परंतु आता कंपनी थेट एकाच वेळी 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीची आर्थिक बचत करण्यासाठी सीईओ यांनी हा निर्णय घेतला आहे.
एआयचा फटका
एआयचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते एआयवर भर देत आहे. एआय टूल्सच्या वाढत्या वापरामुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः ज्या नोकऱ्यांमध्ये पुनरावृत्ती आणि नियमित काम असते, अशा नोकऱ्यांवर गंडातर येऊ शकते, असे विधान सीईओ अँड जॅसी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हापासूनच अॅमेझॉनमध्ये नोकरकपात केली जाईल, असे बोलले जात होते.
- कंपनीने काही ठिकाणी 1 हजार रोबोटची नियुक्ती केल्याने गेल्या वर्षी नॉन-ऑटोमेटेड सेटअपच्या तुलनेत कर्मचारी 25 टक्क्यांनी कमी केले.
- कर्मचारी कपात झाल्यानंतर कंपनीला 2027 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- 2025 ते 2027 या काळात कंपनीची एकूण बचत जवळपास 1 लाख कोटी रुपये वाचतील, असा अंदाज आहे.




























































