आंबा घाट दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर, मंगळवारपासून चारचाकी वाहने धावणार

23 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट गेले दहा दिवस झाले तरीही अजून बंदच आहे. दरडी बाजूला करण्याचे काम बाजूला झालेलं आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.

दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मंगळवार पर्यंत लहान चारचाकी एकेरी वाहतूक सुरू होण्याची चिन्हे असल्याची शक्यता आहे. तब्बल 10 दिवस हा महामार्ग बंद आहे. अशी वेळ पहिल्यांदाच घडली असल्याचे अनेकांनी सांगितले.

त्याचबरोबर हा घाट बंद असल्याने वाहतूकदारांना भयंकर नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेची वाहतूक आंबा घाट बंद असल्याने अणुस्कुरा मार्गे सुरू आहे. त्यामुळे आधीच इंधन दरवाढ आणि त्यात हे वाढणारे अंतर यामुळे नुकसान होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग साखरपा विभागाचे कौशिक रहाटे आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पाच जेसीबी एक पोकलेन, डंपर यासह गटाराच्या बाजूने पाईप टाकून त्यावर कॉक्रिटीकरण करत रस्ता करण्याचा वेगवान प्रयत्न करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय हायवे प्राधिकरण हा रस्ता लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.त्याचबरोबर पोलीस प्रशासन रस्त्यावर करडी नजर ठेऊन आहेत. अनेकजण घाट केव्हा सुरू होणार याकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आंबा घाट लवकर सुरू व्हावा अशा सर्वसामान्य नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे सध्या काम अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या