
कलंकित सोमय्याचा लाजिरवाणा अश्लील व्हिडीओ समोर आल्यामुळे समाजहित लक्षात घेऊन या घृणास्पद कृत्याबद्दल तातडीने कारवाई करणे गरजेचे असताना तिसऱया दिवशीही पोलिसांनी सोमय्याला अटक का केली नाही, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. शिवाय धर्म, साधनशुचिता आणि संस्कृती मानणाऱया भाजपकडूनही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले असताना अशा ‘भक्षका’वर भाजपनेही निलंबनाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
किरीट सोमय्या यांचा घृणास्पद व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांची सर्वत्र छीथू होत असल्याचे सांगत दानवे यांनी या प्रकरणात आठ तासांच्या 35 क्लिप असलेला पेन ड्राइव्ह मंगळवारी विधान परिषदेत सादर केला. याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र या प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे दानवे म्हणाले. अशा प्रकरणात एखादा भाजपचा सामान्य कार्यकर्ता असला असता तर तातडीने कारवाई झाली असती, मात्र यात सोमय्या असल्यानेच कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ते म्हणाले. भाजप धर्म, संस्कृती आणि साधनशूचिता मानणारा पक्ष असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा प्रकरणात सोमय्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवालही त्यांनी केला. सोमय्याच्या किळसवाण्या व्हिडीओबाबतचा पेन ड्राइव्ह आपण विधान परिषदेत दिला आहे. या पेन ड्राइव्हमधील माहिती सभापती तपासतील. मी त्याची तपासणी केली आहे. सुरक्षेच्या आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने ही माहिती उघड करणे योग्य होणार नाही. माझ्याकडे अनेकांनी हा पेन ड्राइव्ह मागितला, मात्र सभापती सोडून हा पेन ड्राइव्ह इतर कुणालाही दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असणारा महाराष्ट्र गेल्या वर्षभरात गुन्हेगारीत आघाडीवर आला आहे. महिला अत्याचारात देशात तिसऱया स्थानावर, बाल गुन्हेगारीत सहाव्या स्थानावर तर एकंदर गुन्हेगारीत दुसऱया क्रमांकावर आल्याने लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारचा धाक-वचक राहिला नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचे दानवे म्हणाले.
कलंकित सोमय्याचा धिक्कार असो!
ऊठसूट विरोधकांवर आरोप करणाऱया सोमय्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. विधान भवनाच्या पायऱयांवर लंपट सोमय्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचाही निषेध करण्यात आला. ‘भगिनी झाल्या बेपत्ता, सरकारला नाही थांगपत्ता’, ‘कलंकित सोमय्या हाय हाय’, ‘लंपट सोमय्याला पाठीशी घालणाऱया भाजपचा धिक्कार असो’ आणि ‘महिलांविरोधी कलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या



























































