
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळच ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या ठिकाणी कोटय़वधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. मात्र कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या कामात स्थानिकांनी अडथळे निर्माण केले. दरे गावाजवळ पोलिसांना थांबविणारी व्यक्ती कोण आणि त्याच्यावर गृह विभाग कारवाई करणार का, असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते व विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-7ने साताऱयाच्या दरे गावाजवळील जावळी गावात छापा टाकून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. या ठिकाणी 115 कोटीचे एमडी ड्रग जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी मुंबई व पुणे येथून सात जणांना अटक केली. सलीम शेख, रहीस शेख, विशाल मोरे, कुरी चेरियाण, कायम सययद ऊर्फ सदाम राजिकूल रहमान आणि हाविजूल इस्लाम अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईवरून दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाच्या कारभाराची पिसे काढली. मुंबई पोलिसांना साताऱयातील ड्रग्ज कारखान्याचा सुगावा लागतो, मात्र सातारा पोलिसांना माहिती नव्हती. मुंबई पोलिसांनी धाड टाकली. मात्र जवळपासच्या गावात राहणाऱया स्थानिकांनी त्यांच्या कामात अडथळे निर्माण केले. या लोकांवर कारवाई केलेली नाही. कारखान्यात बंगालमधून आलेल्या लोकांना अटक करण्यात आली. मात्र त्यांना आणणारे कोण? गृह खाते कोणाला पाठीशी घालत आहे का, असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले.
मिंधेंच्या गावात वीज-पाणी नाही, पण दोन हेलिपॅड सेवेत एकनाथ शिंदे यांच्या दरे गावात वीज, पाण्याची सोय नाही, चांगले रस्ते नाहीत, मात्र दोन-दोन हेलिपॅड सेवेत आहेत. दरे गावाजवळ गुजरातनंतर आता महाराष्ट्रात मोठा एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आला असून मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या राज्यात चालले काय, असा सवाल सोशल मीडियावरून मुख्यमंत्र्यांना करण्यात येत आहे.





























































