
शिंदेनी स्वत: फोडाफोडीचं राजकारण केलं आहे. अख्ख्या जगाला ते माहित आहे. त्यावरच मिंधे गट अवलंबून आहे. आता त्यांना सुरत, गुवाहटी सर्व काही आठवत असेल, असा टोला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मिंधे गटावर जोरदार निशाणा साधला.
”दिल्लीला जाऊन देशाच्या गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे एक विनोदच. महाराष्ट्रात टाचणी जरी पडली त्याची माहिती त्यांना असते. त्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं हे त्यांना सांगणं याला काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की भाजप आपल्या युतीतील पक्षांना कशाप्रकारे संपवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या अर्थी मिंधेंचे सगळेच्या सगळे मंत्री मंत्रीमंडळाच्या बैठकीत बहिष्कार टाकतात, ज्या अर्थी त्यांना गृहमंत्र्यांना भेटावं लागतं. त्यावरून समजून जावं त्यांनी. यासगळ्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतंय याचा अर्थ त्यांचा महायुतीत आता योग्य सन्मान राखला जात नाही” असे अंबादास दानवे म्हणाले.
”शिंदेनी स्वत: काय केले ते अख्ख्या जगाला माहित आहे. आता त्यांची संघटना अशाच फोडाफोडीवर अवलंबून आहे. कुणाला पाच कोटी, कुणाला दहा कोटी. ज्या पायावर मिंधेची संघटना उभी आहे भाजप त्यांना तशाच प्रकारे उत्तर देतेय. आता त्यांना गोवा, सुरत, गुवाहटी आठवत असेल. उद्धव ठाकरे जे भाजपबद्दल सांगत होते ते आता त्यांना आठवत असेल, असेही दानवे म्हणाले.
”नवाब मलिकांचा पाठिंबा राज्यात त्यांना चालतो. यांच्या आशिर्वादाने नवाब मलिक तुरुंगाबाहेर आहेत. ज्या नवाब मलिकांना तुम्ही देशद्रोही म्हणत होते त्यांना अजित पवारांनी तिकीट दिलं ते चालतं हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. ढोंगीपणा आहे”, अशी टीका दानवे यांनी भाजपवर केली.





























































