
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना सरकारकडून तुटपुंजी मदत देऊन थट्टा केली जात आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करून न्याय द्या, अन्यथा शेतकरी मंत्रालयात घुसतील, असा इशारा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज दिला.
राज्यातील 31 जिह्यांमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकरी उघडय़ावर पडला आहे. सर्वसामान्य माणूस संकटात, दुःखात असताना सरकारकडून केवळ आश्वासनांची घोषणा केली जात आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्यासाठी कान, डोळे आहेत का? असा सवालही त्यांनी केला. सध्या 60 लाख हेक्टर जमीन अजून पाण्यातच आहे. मदतीसाठी शेतकरी आंदोलने करीत आहेत. हे सरकारला दिसत नाही का? याबाबत उत्तर देण्यासाठी सरकारला तोंड आहे काय, असा टोलाही त्यांनी लगावला.
मदत निधीची घोषणा फसवी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी तातडीने देण्यात आली. मात्र आताच्या सरकारने 2200 कोटींची घोषणा करून प्रत्यक्षात केवळ 1300 कोटींनाच मंजुरी दिली. त्यामुळे सरकारची मदत निधीची घोषणा फसवी असल्याचे ते म्हणाले. आठ महिन्यांत 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे सरकारने कठोर निकष न लावता पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50 हजारांची मदत करा, अशी मागणीही त्यांनी केली.
सरकार आणखी किती बळी घेणार?
बळीराजा संकटात असताना सरकार उफराटा कारभार सुरू आहे. शेतकऱ्याच्या वस्तूंना हमीभाव नाही. त्यामुळे एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा शेतकरी आणखी संकटात सापडल्याचे उपनेता नितीन बानुगडे-पाटील म्हणाले. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील एका गावात 28 महिन्यांत 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकार आणखी किती बळी घेणार, असा सवालही बानुगडे-पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला विचारले, सरकारविरोधात का बोलतो? त्यावर तो म्हणाला, मी आपल्या नाही दुसऱ्या देशाच्या सरकारविरोधात बोललो. यावर पोलीस म्हणाले की, अरे आम्हाला माहीत नाही का की, सरकार कुठले बिनकामाचे, निकम्मे आहे ते. या उदाहरणातून राज्यातील सरकार बिनकामाचे असल्यावर शिक्कामोर्तबच झाल्याचे पाटील म्हणाले.
कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचा चिखल केला!
मैदानात असलेल्या चिखलाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच भाजपवर तुफान हल्ला चढवला. ‘सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई आहे. कमळाबाईने स्वतःची कमळं फुलवून घेतली आहेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल झाला आहे,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.