
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हा एक अजब चमत्कारच आहे. या रुग्णालयात बुधवारी रात्री एक बाळ जन्माला आले. बाळ हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी तपासून त्या बाळाला मृत घोषित केले. नशिबाला दोष देत बाळ पिशवीत टाकून अंत्यसंस्कारासाठी घरी नेण्यात आले आणि काय चमत्कार… बाळाचे चलनवलन सुरू झाले…! घरच्यांनी बाळाला घेऊन स्वाराती गाठले. सध्या या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील होळ येथील बालिका घुगे ही महिला प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली. गर्भाशयाचे तोंड फुटल्याचे तपासणीत निदर्शनास आले. मुदतपूर्व प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन 900 ग्रॅम असल्यामुळे त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. रात्रभर पेटीत ठेवूनही बाळ हालचाल करत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित करून आजोबाच्या स्वाधीन केले.
आजोबांनी मृत बाळ पिशवीत टाकून 17 किमी अंतरावर असलेल्या होळ या गावी अंत्यसंस्कारासाठी नेले. अंत्यसंस्कारासाठी आजीने बाळाला पिशवीतून बाहेर काढले. बाहेर काढताच बाळाने हालचाल केली आणि रडायला सुरूवात केली. बाळ जिवंत असल्याचे पाहून नातलगांना सुखद धक्का बसला. बाळाला घेऊन पुन्हा घुगे कुटुंब स्वाराती रुग्णालयात आले. बाळ जिवंत असल्याचे उपचार पाहून डॉक्टरांचे डोळेच पांढरे झाले. या बाळावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दोन समित्या नेमल्या आहेत. या समित्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिष्ठातांनी सांगितले.