
शासनाच्या सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येतो. मात्र अंबरनाथ तालुक्यातील जावसई शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्तीच मिळाली नाही. शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे नमूद करून पालकांच्या बोगस सह्या केल्या आहेत. याबाबत पालकांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शिष्यवृत्तीचे पैसे लाटल्याची तक्रार केली आहे.
इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना १००० रुपये आणि ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना १५०० आणि ८ वीपासून पुढे २००० रुपये अशी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. मात्र जावसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून तसेच स्वाक्षरी आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, अंगठ्याचे ठसे आणि स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत पालकांनी गटशिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे लेखी तक्रार करून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुनीता वाघे यांच्यासह पालकांनी केली आहे.
“शाळेतील हे रजिस्टर आम्ही ताब्यात घेतले असून पालकांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेला सादर करण्यात येईल.“
विशाल पोतेकर, गट शिक्षण अधिकारी