अंबरनाथच्या प्राध्यापकाने बनवली निर्जंतुकीकरण करणारी ‘जादूची पेटी’

697

लाखो निरापराधांचा बळी घेणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला आज लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचा थैमान रोखण्यासाठी सर्वच थरातून प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयत्न सध्या अंबरनाथमधील भौतिकशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापकांनी केला आहे. 68 वर्षाच्या भगवान चक्रदेव यांनी लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करत घरीच नोटा, भाज्या, मास्क, हॅण्डग्लोज निर्जंतुकीकरण करणारी ‘जादूची पेटी’ बनवली आहे.

50 बाय 50 सेमीच्या या लाकडी पेटीत 200 व्हॉल्टचा बल्ब लावण्यात आला आहे. पेटीच्या आत लावलेल्या आरशांमुळे प्रकाशाचे परावर्तन होऊन 70 डिग्रीपर्यंतचे तापमान तयार होते. कोणताही विषाणू 56 डिग्री तापमानाच्यावर जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे या पेटीत रोजच्या वापरातील कपड्यांसोबत वस्तू ठेवल्यास काही मिनिटांतच कोरोनाचा विषाणू फाट्याककण फुर्रर होऊन निर्जंतुकीकरण होते असा दावा चक्रदेव यांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषीत केले आहे. चिनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या महामारीने संपूर्ण जगाला घेरले आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात कोरोनाबाधीत रुग्णांची आकडेवारी सध्या कमी दिसत असली तरी या युद्धात संपूर्ण आरोग्य यंत्रणा ताकदीने लढत आहे. पण  आजारावर कोणतेच ठोस औषध सध्या शोधूनही सापडत नसल्याने काळजी घेणे हा एकमेव उपचार हातात आहे. सोशल डिस्टंट, सतत हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावण्यासोबतच निर्जंतुकीकरण हे उपाय कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. म्हणूनच अंबरनाथमधील निवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यांनी नेहमीच्या वापरातील वस्तूंना निर्जंतूक करणारी पेटी बनवली आहे.

मुळचे रायगड जिल्ह्यातील कर्जतयेथील रहिवासी असलेले भगवान चक्रदेव गेली अनेक वर्षे आपल्या पत्नीसोबत अंबरनाथ येथे राहतात. उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयात प्राध्याक म्हणून त्यांनी नोकरी केली. आपल्या 33 वर्षांच्या सेवेनंतर ते भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी विज्ञान प्रसाराची मोहिम हाती घेतली. शाळा, महाविद्यालयांसोबत अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानांचे खास आयोजन केले जाते. मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ शाखेचे ते अध्यक्ष आहेत. वयाच्या 68 व्या वर्षीही काहीना काही करण्याची धडपड त्यांची सुरू असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकडाऊनमुळे त्यांच्या या चळवळीला ब्रेक लागल्यासारखे त्यांना भासू लागले. तर दुसरीकडे कोरोना आणि त्यासारख्या विषाणूंना रोखण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचारांनी त्यांना अस्वस्थ केले. त्यातूनच निर्जंतुकीकरण करणाऱ्या पेटीचा अविष्कार त्यांनी घडवला.

घरातील लाकडी फळया, आरसे, 200 वॉल्टचा बल्ब अशा साहित्याची जुळवाजुळव केली. 50 बाय 50 सेंटीमिटरची लांबी रुंदी आणि 20 सेमीची उंची असणारी पेटी त्यांनी तयार केली. आतील बाजुला आरसे आणि बल्प लावला. 200 व्हॉल्टच्या बल्बचा प्रकाश आरशांवर पडून प्रकाशाचे पारर्वन होते. त्यामुळे काही क्षणातच पेटीमधील तापमान 70 डिग्रीपर्यंत पोहचते. त्यानंतर दिवा आपोआपच बंद होतो व पेटी चे तापमान सामान्य होते. कोणताही विषाणू 50 ते 60 डिग्री तापमानात तग धरू शकत नाही. कोरोना विषाणूही. त्यामुळे बाहेरुन घरी आल्यावर तुम्ही या पेटीमध्ये नोटा, भाज्या, कपडे,  मास्क, हॅण्डग्लोज ठेवल्यास काही क्षणातच ते निर्जंतूक होतात.

प्रोडक्शनसाठी पुढाकाराची गरज
निवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यांनी ही निर्जंतुक करणारी पेटी तयार केली असली त्याच्या पेटंटसाठी ते कोणताही अर्ज करणार नाहीत किंवा त्याचे प्रोडक्शन करून ती बाजारात आणणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. उलट होतकरु तरुणांनी पुढाकार घेऊन भविष्याची गरज म्हणून या पेटीचे प्रोडक्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पेटंट पेक्षा या पेटीच्या कॉपीची व मार्केटिंगकची  समाजाच्या आरोग्यासाठी गरज असल्याचे त्यांनी ‘दैनिक सामना’ला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या