
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांच्या हत्येवरील टिप्पणीनंतर किमेलचा शो निलंबित करण्यात आला. शो बंद केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आता तो पुन्हा परत येणार आहे. परंतु असे असले तरीही काहींनी मात्र या शोवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने, अमेरिकेमधील स्थानिक एबीसी स्टेशन्सच्या मालकांनी हा बहिष्कार कायम ठेवला आहे. त्यामुळेच आता सर्वांचे लक्ष जिमी पुन्हा येणार तेव्हा काय बोलणार याकडेच लागलेले आहे.
आपल्या देशासाठी भावनिक क्षणी तणावपूर्ण परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून आम्ही शो दाखवणार नसल्याचे एबीसीचे मालक डिस्नेने सोमवारी सांगितले. हा निर्णय घेण्यामागे किमेल यांच्याकडून झालेल्या काही अयोग्य टिपण्ण्या आहेत.
किमेलने कर्कच्या कुटुंबाची माफी न मागितल्यास, शो पुन्हा सुरू झाल्यावर प्रसारित करणार नाहीत असे काहींनी म्हटले आहे. नेक्सस्टारनेही याचेच अनुकरण करत किमेल यांच्या शोवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. किमेल अचानक गायब झाल्यामुळे उदारमतवादी वर्तुळात संताप निर्माण झाला आहे. विरोधकांनी म्हटले की, ट्रम्प यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
किमेलने मात्र याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी मंगळवारी इंस्टाग्रामवर दिवंगत निर्माते नॉर्मन लिअर यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. लिअर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक होते. या फोटोला त्यांनी कॅप्शन देत म्हटले, “आज या माणसाची आठवण येत आहे.”