अमेरिका ओपन टेनिस – स्टेफानोस, सिमोना सलामीलाच गारद; सेरेना, मेद्वेदेव दुसऱ्या फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची सुरुवातच धक्कादायक निकालाने झाली. पुरुष एकेरीत स्टेफानोस सितसिपास आणि महिला एकेरीत सिमोना हालेप हे मानांकित खेळाडू सलामीलाच गारद झाले. 23 ग्रॅण्डस्लॅम पदकाची राणी असलेली अमेरिकेची सेरेना विल्यम्स व गतविजेता डॅनियल मेद्वेदेव यांनी अपेक्षित विजयासह आपल्या अभियानास प्रारंभ केला.

चतुर्थ मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सितसिपासवर पात्रता फेरीतून आलेल्या कोलंबियाच्या डॅनियल इलाही गॅलन याने 6-0, 6-1, 3-6, 7-5 असा खळबळजनक विजय मिळवला. सातव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपला युव्रेनच्या डारिया सिंगुर हिने 6-2, 0-6, 6-4 असे पराभूत केले.

यंदाच्या अमेरिका ओपनमधील सर्वात बुजुर्ग खेळाडू असलेल्या सेरेना विल्यम्सने इस्टोनियाच्या डंका कोविनिक हिचा 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये फडशा पाडत विजयी सलामी दिली. सेरेनाने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. ज्या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पदार्पण केले होते, त्याच स्पर्धेतून ही महान खेळाडू निवृत्त होणार आहे. गतविजेत्या डॅनियल मेद्वेदेवने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्याने अमेरिकेच्या स्टीफन कोजलोवचा 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आपण ज्युनियर गटातही कोजलोवचा सामना केलेला आहे, असे मेद्वेदेव म्हणाला.