
कॅनडाची 19 वर्षीय युवा महिला टेनिसपटू लेला फर्नांडिज हिची अमेरिकन ओपन टेनिस या ग्रॅण्डस्लॅममधील शानदार कामगिरी मंगळवारी रात्रीही सुरूच राहिली. याआधी चार वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन ठरलेल्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का देणाऱया लेला फर्नांडिज हिने पाचवी सीडेड एलीना स्वितोलीना हरवत पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठली हे विशेष.
लेला फर्नांडिज हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एलीना स्वितोलीना हिला 6-3, 3-6, 7-6 अशा तीन सेटमध्ये नमवत ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले. या विजयानंतर लेला फर्नांडिज म्हणाली, माझ्या खेळावर विश्वास ठेवते. गुण जिंकू किंवा हरू स्वतःच्या मनाला सांगत असते की स्वतःवर विश्वास ठेव.
सबालेंकाचीही आगेकूच
जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असलेल्या एरीना सबालेंका हिनेही अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम महिला एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने बार्बोरा व्रेझीकोव्हा हिला 6-1, 6-4 अशा फरकाने पराभूत करीत अंतिम चारमध्ये एण्ट्री मारली.
पुरुषांच्या गटात चुरशीच्या लढती
पुरुष एकेरी गटात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. फेलीक्स अलीसीम-डॅनिल मेद्वेदेव यांच्यामध्ये सेमी फायनलची लढत रंगणार आहे. तसेच नोवाक जोकोविचसमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मॅटीयो बेरेट्टीनीचे आव्हान असणार आहे. त्याआधी अॅलेक्झॅण्डर झ्वेरेव व लॉईड हॅरीस यांच्यामध्ये उपांत्यपूर्व लढत पार पडेल.





























































