
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे, पण सध्या मतदारयादीतील घोळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदारयादीतील त्रुटींवर बोट ठेवले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना मतदारयादीतील घोळावरून प्रश्न विचारले होते. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करीत असल्याची टीका केली होती. मागील पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मतदारयाद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या. पाच वर्षे निवडणुका घेतल्या नाहीत. अजून सहा महिने निवडणुका घेऊ नका, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाच्या मतदारयादी प्रमुखांची बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोयाकडे केलेली मागणी व निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर यावर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. मतदारयाद्यांमधील घोळाबाबत मनसेची पुढील भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.


























































