शत्रूच्या रडारचा वेध घेणारे ‘एमिसॅट’ 28 नॅनो उपग्रहांसह झेपावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pslv-c-45 EMISAT

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) अंतराळात आणखी एक कामगिरी बजावली आहे. इस्रोने सोमवारी आपल्याच पीएसएलव्ही रॉकेटद्वारे ‘एमिसॅट’ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. हा उपग्रह हिंदुस्थानच्या संरक्षण विभागासाठी मोठय़ा फायद्याचा आहे. कारण डीआरडीओने बनवलेला हा उपग्रह शत्रूच्या रडारचा शोध घेण्यास सक्षम आहे. एमिसॅटविषयी माहिती देताना इस्रोने म्हटले आहे की, पीएसएलव्ही रॉकेट 436 किलो वजनाचा एमिसॅट उपग्रह जमिनीपासून 749 किलोमीटर अंतरावर स्थापित करणार आहे. हा उपग्रह हिंदुस्थानी लष्करासाठी शत्रूच्या देशातील छायाचित्रे पाठवू शकणार आहे.

‘एमिसॅट’ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. हे प्रक्षेपण म्हणजे एक ऐतिहासिक घटना असल्याचेही मोदींनी म्हटले. ते एका निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

पाच हजार लोकांनी पाहिले लाइव्ह
इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘एमिसॅट’ उपग्रहाचे प्रक्षेपण सोमवारी केले. त्यावेळी ही घटना तब्बल पाच हजार लोकांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिली. इस्रोने त्यासाठी खास व्यवस्थाच केली होती. यासाठी स्टेडियमसारखी गॅलरी बनवण्यात आली होती, ज्यात 5 हजार लोक बसू शकतात. या सर्वांनी समोर प्रत्यक्ष प्रक्षेपण होतानाची घटना पाहिली. अशा प्रकारची व्यवस्था फक्त अमेरिकेच्या नासाने केली होती.

28देशांचे उपग्रह
पीएसएलव्ही-सी45 या रॉकेटद्वारे डीआरडीओने ‘एमिसॅट’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह अंतराळात हिंदुस्थानची ताकद मजबूत करणार आहे. या उपग्रहासोबतच या रॉकेटने छोटे छोटे 28 उपग्रहही अंतराळात पाठवले आहेत.