क्रिकेट म्हणजे माझं पहिलं प्रेम… हिंदुस्थानच्या आणखी एका खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि आपल्या फिरकीच्या तालावर मातब्बर फलंदाजांना नाचवणारा फिरकीपटू अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा 25 वर्षांचा हा चढ-उतारांचा प्रवास संपुष्टात आला आहे. “आज 25 वर्षांनी मी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. क्रिकेट माझं पहिलं प्रेम, माझा शिक्षक आणि माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.” अशी भावनिक पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

अमित मिश्राने हिंदुस्थानसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2003 साली खेळला होता. त्यानंतर गेली 25 वर्ष त्याने विविध स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. अखेर गुरुवारी (4 ऑगस्ट 2025) त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती होत असल्याचे जाहिर करत सर्वांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, ” आज 25 वर्षांनंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. क्रिकेट माझं पहिलं प्रेम, माझा शिक्षक आणि माझ्या आनंदाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. माझा हा प्रवास असंख्य भावनांनी भरलेला आहे. मी BCCI, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, माझे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचा मनापासून आभारी आहे. चाहत्यांच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला प्रत्येक पावलावर बळ दिलं. सुरुवातीच्या काळात झालेल्या संघर्षापासून ते मैदानावरील अविस्मरणीय क्षणांपर्यंत प्रत्येक अध्याय हा माझ्यासाठी एक अनुभव आहे, ज्यामुळे मला क्रिकेटपटू म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आकार दिला. क्रिकेटने मला सर्वकाही दिले आहे.” असं म्हणत त्याने कुटुंबाचे, सहकाऱ्यांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत.

अमित मिश्राने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 2003 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. बांगलादेशमधील ढाका येथे झालेल्या या वनडे सामन्यात त्याने पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर 2008 साली कसोटी आणि 2010 साली त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1 फेब्रुवारी 2017 साली खेळला होता. त्याचबरोबर त्याने IPL मध्ये सुद्धा आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली.

अमित मिश्राला आयपीएलमध्ये चार संघांकडून खेळण्याची संधी मिळाली असून त्याने एकून 162 सामन्यांमध्ये 174 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांकडून हॅट्रीक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.  अमित मिश्राने 2008 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2011 साली डेक्कन चार्जर्स आणि 2013 साली सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना हॅट्रीक घेण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा एक दुर्मीळ विक्रम आहे, जो मोडणं जवळपास अशक्य आहे.

Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश