
जम्मू–कश्मीरमधून 370 कलम हटवण्याआधीपासून कश्मीरमध्ये ठाण मांडून बसलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था, निर्बंध आणि कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. यावेळी गृहसचिव राजीव गौडा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डोवाल गेले 10 दिवस कश्मीरमध्ये होते. त्यांनी स्वतः सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर कश्मिरी लोकांशी थेट बोलून त्यांचे प्रश्न आणि गैरसोयी जाणून घेतल्या.
लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहर नगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग या भागातील शाळा उघडण्यात आल्या. दरम्यान, हायस्कूल. उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांबाबत येत्या 2 ते 3 दिवसांत निर्णय घेण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अफवांमुळे 2 जी इंटरनेट सेवा बंद
अफवांना आळा घालण्यासाठी सर्वज जिह्यांमधील 2 जी इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. व्हॉट्सऍपवरून मोठय़ा प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा थांबवण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
खासगी वाहनांची ये–जा वाढली
श्रीनगरमध्ये ज्या भागात शांतता कायम आहे. त्या भागातील पोलिस सुरक्षा हटवण्यात आली आहे. खोऱ्यात बाजार बंद होता. तर सार्वजनिक वाहतुक सेवाही बंद होती. मात्र, निर्बंध शिथिल केल्यामुळे अनेक भागात रस्त्यांवर खाजगी वाहनांची ये–जा वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पट्टन, पल्हालन, सिंहपूरा, बारामुल्ला आणि सोपोर याठिकाणी निर्बंध अद्याप शिथिल करण्यात आलेले नाहीत. काही भागात अद्याप शाळा पूर्णपणे सुरू करण्यात आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कश्मीर खोऱ्यातील आणखी 10 टेलिफोन एक्स्चेंज सुरू करण्यात आले. यापूर्वी 17 टेलिफोन एक्स्चेंज सुरू करण्यात आले होते. 50 हजार लँडलाईन टेलिफोन फिक्स्ड लाईनपैकी 28 हजार सेवा सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
























































