
बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करणार असून दोन तृतीयांश मतांनी निवडून येणार आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप अधिक जागांवर निवडून आली तरी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली.
बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर वृत्तवाहिन्यांशी बोलताना अमित शहा यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले. बिहारमध्ये विकासाची अनेक कामे नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहेत. एनडीए सरकारमुळे बिहारची प्रगती झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत भाजपच्या कितीही जागा निवडून आल्या तरी त्यामुळे विशेष फरक पडणार नाही. एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नितीश कुमार हेच असून मुख्यमंत्रीही तेच होतील. यावेळी चिराग पासवान यांच्याविषयी बोलताना अमित शहा म्हणाले, लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वक्तव्यानेच आमची निवडणुकीसाठीची युती तुटली. चिराग यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चिराग यांनीच युती तोडली आहे, असे ते म्हणाले.



























































