अयोध्येत चार महिन्यात भव्य राममंदिर उभे राहील – अमित शहा

712

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येतील राममंदिर निर्माणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. येत्या चार महिन्यात अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहील, असे शहा यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी शहा यांची पाकुडमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी राममंदिराच्या निर्माणाबाबत माहिती दिली. राममंदिर निर्माणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहील, असे ते म्हणाले.

अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहावे अशी जगभरातील हिंदुस्थानींकडून 100 वर्षंपासून मागणी होत आहे. देशातील प्रत्येकाला रामजन्मभूमीवर राममंदिर हवे आहे. मात्र, काँग्रेस आणि त्यांचे वकील या कामात अडचणी निर्माण करत होते. काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल न्यायालयात म्हणाले होते, आता हे प्रकरण सुरू करू नका, तुमच्या का पोटात दुखत आहे, असा सवाल शहा यांनी केला. या कामात काँग्रेसने अडचणी निर्माण केल्या आहेत. मात्र, आता चार महिन्यात अयोध्येत राममंदिर उभे राहील, असे शहा यांनी सांगितले.

राममंदिराचा मुद्दा उपस्थित करत शहा यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. तसेच काँग्रेस विकासही करू शकत नाही आणि देशाला सुरक्षितही ठेऊ शकत नाही. काँग्रेस जनतेच्या मतांचा आणि भावनेचा सन्मान करत नसल्याचेही शहा म्हणाले. ही वीरांची भूमी आहे. इंग्रजांना देश सोडण्याचा इशारा याच भूमीतून देण्यात आला होता. इंग्रजाविरोधातील लढाईत येथील आदिवासींना बलिदान दिल्याचेही शहा म्हणाले. झारखंडमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर जबरदस्तीने करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यात आले. तसेच आदिवसींना मदत करण्याचे कार्य करण्यात आले, असेही शहा म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या