हिंदू शरणार्थिना संरक्षण देणार; घुसखोरांना हाकलणारच – अमित शहांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन शरणार्थिंना हिंदुस्थान सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. त्यांना संरक्षण देऊन हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत घुसखोरांना देशातून हाकलण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. राष्ट्रीय नागरीक सुधारणांवरून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एनआरसी अगोदर आम्ही नागरिक सुधारणा विधेयक आणणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोलकातामध्ये ‘एनआरसी’ जागरूकता कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते. त्यांनी याबाबत सरकराचे धोरण स्पष्ट केले. जनतेची या मुद्द्यावरून दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला सत्य सांगण्यासाठी आपण आल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन शरणार्थिंना देशातून बाहेर काढले जाणार नाही. त्यांना देशाचे नागरिकत्व देण्यात येईल. सर्वसामान्य माणसांना असलेले सर्व अधिकार त्यांना मिळतील. मात्र, घुसखोरांना देशातून हाकलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी न्यायालयातून परवानगी घ्यावी लागत होती. आता आपण दुर्गापूजा करण्यासाठी आलो आहोत, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असेही ते म्हणाले. कलम 370 हटवण्याचा नारा सर्वात आधी पश्चिम बंगालमधूनच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालमधूनच एक देश, एक संविधानचा नारा दिला होता, असे सांगितले. ‘जहां हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है’, असा नाराही त्यांनी दिला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसला वाटले होते हा मुद्दा संपला. मात्र, त्यांना हे माहिती नाही की, आम्ही भाजपावाले आहोत, एखादा विषय हाती घेतला तर तो मार्गी लावल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही भाजपाचे सरकार आणले व आम्ही जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे कलम 370 हटवले आहे.

भाजपाला 300 पेक्षा जास्त जागा मिळवून देण्यात पश्चिम बंगालच्या जनतेचे मोठे योगदान आहे. पश्चिम बंगालमध्ये शहीद झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्यात सत्ताप्रिवर्तन होऊन भाजपा बहुमताचे सरकार बनणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.