शहांकडून ‘चं.पा.’ यांची चंपी; शिवसेना प्रमुखांसदर्भातील वक्तव्यावरून दिली तंबी, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबरी मशिदीच्या पतनावेळचा संदर्भ देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते व राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. या वक्तव्यावरून विरोधी पक्षाने पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवून राजीनाम्याची मागणी केलेली असताना भाजप आणि शिंदे गटानेही पाटलांच्या वक्तव्यापासून सुरक्षित अंतर राखले आहे. या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत वादग्रस्त विधाने टाळा. अशी तंबी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमित शहा यांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील सहकारी या एकमेव बलस्थानावर चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात धुडगूस घातला आहे. जनाधार नाही, व्हिजन नाही, मेहनत नाही, कोणतेही जमेची बाजू नसताना सातत्याने वादग्रस्त विधाने करून पाटील हे पक्षाला अडचणीत आणत आहेत. बाबरी मशीदीच्या पतनावेळी एकही शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हता. शिवसेनाप्रमुखांचा त्यात कसलाही सहभाग नव्हता, असे वादग्रस्त वक्तव्य करून चंद्रकांत पाटील यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. पाटील यांच्या वक्तव्यावर सर्वच थरातून सडकून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राजधानीत भेट घेतली. या भेटीत शहा यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. कसबा पोटनिवडणुकीत चुकीचा उमेदवार देणे, महात्मा फुलेंसह इतर महापुरुषांबद्दल वाटेल ते बरळणे या कारणांमुळे चंद्रकांत पाटील तसेही पक्षनेतृत्वाच्या रडारवरच आहेत.

ते वक्तव्य टाळता आले असते…

बाबरी मशीद पतन ही सकल हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. त्याचे राजकीय श्रेय आम्ही कधी घेतले नाही. या संपूर्ण आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पाटील यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे, मात्र ते वक्तव्य त्यांना टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया आशीष शेलार यांनी मीडियाशी बोलताना दिली.