एका जवानाच्या बदल्यात 10 मारू, शहांनी सांगलीत भरला हुंकार

5114

विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तसे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीचे नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. गुरुवारी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगली येथे सभा घेतली. सांगलीतील सभेमध्ये अमित शहा कलम 370 मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा तसेच ‘कश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील’ या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला परतुरमध्ये

राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना शहा म्हणाले की, जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल केल्यापासून अर्थात 5 ऑगस्टपासून ते 5 ऑक्टोबरपर्यंत एकही गोळी चालली नाही. यावेळी शहा यांनी राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले.

शहा पुढे म्हणाले की, मोदींनी जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याला कडाडून विरोध केला. संपूर्ण देश कश्मीरबाबत केंद्रसरकारच्या पाठीशी ठाम असताना त्यांनी (काँग्रेस-राष्ट्रवादी) विरोध केला. कश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे ते (राहुल गांधी) म्हणतात, परंतु 5 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबरदरम्यान खोऱ्यात एकही गोळी चालवण्याची वेळ आली नाही. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेला अधिक महत्त्व दिले असून एक जरी लष्करी जवान शहीद झाला तर शत्रू राष्ट्राच्या 10 जणांना यमसदनी पाठवू, असा हुंकार अमित शहा यांनी भरला.

काँग्रेस-राष्ट्रवादी घराणेशाहीत अडकली
अमित शहा यांनी सांगलीतील सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेत असताना 15 वर्ष काय केले असा सवाल केला. एनडीए सरकारने गेल्या 5 वर्षात मागील सरकारपेक्षा जास्त काम केले. विधानसभा निवडणूक आम्ही मोदी, फडणवीस यांच्या नेतृत्वात लढत आहोत, तर काँग्रेस-राष्ट्रवादी घराणेशाहीत अडकले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या