शिवसेनेचा सन्मान ठेवून युती करा, अमित शहा यांचे भाजप नेत्यांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

शिवसेना हा आपला सर्वात जुना मित्र पक्ष असून जागावाटपा वेळी फारशी खळखळ न करता शिवसेनेचा सन्मान राखून युती करा आणि शिवसेनेच्या मदतीने महाराष्ट्र प्रचंड बहुमताने दणदणीतपणे पुन्हा एकदा काबीज करा, असे आदेश भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिले.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची युती आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या चाचपणीसंदर्भात शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची मॅरेथान बैठक बोलावली होती. दुपारी साडेबाराला सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री उशिरापर्यंत सुरूच होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, त्याचबरोबर भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी, खासदार भूपेंद्र यादव, भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष आदी नेते उपस्थित होते.

…तर निवडणूक जड जाईल
या बैठकीत शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा अर्थातच केंद्रस्थानी होती. शिवसेनेसोबत युती केली आणि शिवसेनेशिवाय निवडणूक लढवली तर काय परिस्थिती राहील, यावरही बैठकीत विस्तृत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र शिवसेना हा केडरबेस पक्ष असून भाजपचा सर्वात जुना सहकारी पक्ष आहे. शिवसेनेसोबत युती न केल्यास हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट होईल, त्याचबरोबर शिखर बँकेच्या ‘ईडी’ चौकशी प्रकरणाने राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाल्यास भाजपला निवडणूक जड जाईल, असा मतप्रवाहही या वेळी व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी युती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा योग्य तो सन्मान राखून युती करा, जागावाटपाबाबत फार खळखळ करू नका, अशा सूचना अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्याचे या सूत्रांनी सांगितले.

जागावाटपाचा फार्म्युला उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतरच
युतीत शिवसेना आणि भाजप किती जागा लढवणार, इतर मित्रपक्षांना किती जागा सोडल्या जाणार, यावर मीडियातून पतंगबाजी सुरू असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार्म्युल्याबाबत चर्चा करणार आहेत. या बैठकीचा तपशील घेऊन मुख्यमंत्री फडणवीस रविवारी होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा फार्म्युला आणि शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका मांडतील. त्यानंतर याच बैठकीत युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होऊन मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे युतीची औपचारिक घोषणा करतील, अशी माहिती भाजपातील सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी रडारवर…
शिखर बॅंकेतील घोटाळ्या प्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे पवारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती एन्कॅश करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँगेस करत असली तरी राष्ट्रवादीने आजवर केलेले घोटाळे एक्सपोज करा, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या घोटाळ्यांवर फोकस करून ते आक्रमकपणे जनतेपुढे मांडा, अशा सूचनाही शहा यांनी केल्याचे समजते. शिखर बँकेचा घोटाळा इतका मोठा होता तर आपला सहकार मंत्री असताना त्याचा पाठपुरावा निवडणुकीपूर्वी का झाला नाही, इतका विलंब का लागला, अशी विचारणा करत अमित शहा यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी वर्तवल्याचेही सूत्रांनी सांगितले.