मतांच्या लालसेपोटी पवारांना मोतीबिंदू झालाय!

1419

हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि 370 चा काय संबंध अशी विचारणा करतात. पवारजी, तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवे आहे हे देखील माहीत नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला.

राजुरा येथे झालेल्या सभेत बोलताना अमित शहा यांनी 370 चा मुद्दा निवडणूक प्रचारात वापरल्याबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि टिळकांचा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरू झाली होती आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि 370 चा काय संबंध अशी विचारणा करतात. इतकेच असेल तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी पुन्हा सत्तेत आल्यानंतर 370 पुन्हा आणू असे बोलून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आणि भाजपा कार्यकर्ते एक दिवस आधीच राज्यात दिवाळी साजरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात एकीकडे भाजपा जिथे मोदींच्या नेतृत्वातील देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आणि शरद पवारांची घराणेशाही असणारा पक्ष असल्याची टीका शहा यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या