मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस, अमित शहा यांचा काँग्रेसवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी पाचजणांना करण्यात आलेली अटक योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच शैलीत जोरदार पलटवार केला. ‘मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय’ अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला.

‘मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस पक्ष होय. हिंदुस्थानचे तुकडे तुकडे गँग, माओवादी, बोगस सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचं समर्थन करा, इमानदारीने काम करणाऱयांना बदनाम करा, राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये तुमचे स्वागत आहे’ अशी खोचक टिप्पणी ट्विटरवरून करीत शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. भाजपच्या राज्यात केवळ एकाच एनजीओला स्थान आहे ते केवळ आरएसएसला. बाकी सर्व एनजीओ बंद करून त्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात धाडणे हा मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे अशी टीका 28 ऑगस्टला राहुल गांधी यांनी केली होती त्याला आज शहा यांनी प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करणाऱयांना चपराक
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करून तिला कमजोर करू पाहणाऱयांच्या पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे शहरी नक्षलवादावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेससाठी हीच योग्य वेळ असल्याचा टोलाही शहा यांनी लगावला आहे.

…आणि 50 कोटी हिंदुस्थानींना फक्त दोन हजार कोटी रुपये
देशाचे चौकीदार ‘खुल जा सिम सिम’ कधी म्हणतात असा सवाल करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज उद्योगपती अनिल अंबानींना राफेल घोटाळ्यातून 1 लाख 40 हजार कोटी रुपयांची भेट आणि 50 कोटी हिंदुस्थानींच्या ‘आयुषमान भारत’ योजनेसाठी दोन हजार कोटी रुपये म्हणजे 5 लाखांच्या विम्यासाठी प्रत्येक नागरिकावर प्रतिवर्ष फक्त 40 रुपये खर्च! ‘वाह रे मोदी सरकार’ अशी टीका ट्विटरद्वारे केली.