बिग बी पूर्णपणे फिट, मंगळवारपासून “कौन बनेगा करोडपती”च्या शूटींगला जाणार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन रुटीन चेक अपसाठी रुग्णालयात गेल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या चाहत्यांत मोठी चिंता होती.आता सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील लोकप्रिय “कौन बनेगा करोडपती” मालिकेचे काय होणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला होता.पण नानावटी रुग्णालयातील उपचारानंतर अमिताभ पूर्णपणे फिट झाले असून येत्या मंगळवारपासून ते पुन्हा “कौन बनेगा करोडपती”च्या पुढच्या भागांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत.वृत्तसंस्थेने दिलेल्या या माहितीने “बिग बी “यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

नियमित वैद्यकीय चाचणीसाठीच बिग बी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात गेले होते.सध्या ते रुग्णालयात नाहीत आणि पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या प्रकृतीबाबतची चाहत्यांची चिंता दूर झाली आहे. रुग्णालयात कुणीतरी अमिताभ यांना पाहीले आणि त्यांच्या प्रकृतीविषयीच्या चर्चाना उधाण आले. ते रुग्णालयात भरती झालेच नव्हते, असे अमिताभ यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात त्यांची “केबीसी”साठी शूटिंगचा नव्हती. कारण सोनीकडे दिड आठवड्यांचे एपिसोड आधीच तयार आहेत.असेही सोनी टीव्हीच्या सूत्रांनी  स्पष्ट केले.

स्पॉट बॉयच्या माहितीमुळे चिंतेचे वातावरण

गुरुवारी रात्री गेल्या आठवड्यात केबीसीच्या एका स्पॉट बॉयने अमिताभ बच्चन मुंबईच्या नानावटी रुग्णालयात गेले तीन दिवस यकृतावरील उपचार घेत होते अशी माहिती दिली. त्यातच अमिताभ यांनी आपल्या एका मुलाखतीत आपल्या यकृताच्या समस्येचा उल्लेख केला होता. त्यामुळेच अमिताभ नानावटीत गेले कळल्यावर त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चांना  पेव फुटले होते. अमिताभ यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी सोशल मीडियावर दुवा मागण्याचीही सुरुवात केली होती.पण आता त्यांच्या चाहत्यांची चिंता वृत्तसंस्थेच्या माहितीमुळे दूर झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या