पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी सरसावले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर- सांगलीतील पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो संसार पाण्यात वाहून गेले आहेत. अशा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील सरसावले आहेत. ‘केबीसी’निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बच्चन यांनी याची घोषणा केली.

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार पुढाकार घेत असताना बॉलीवूड कलाकार गप्प का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र चित्रपट कलाकार मदत करतात, पण ते त्याची जाहिरात करत नाहीत. त्यापैकीच मी एक आहे. मी केलेल्या सामाजिक कामांची जाहिरातबाजी करायला मला आवडत नाही, असे बिग बी म्हणाले. तसेच नुकतेच मुख्यमंत्र्यांशी माझे यासंदर्भात बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाटय़ परिषदही करणार मदत
पूरग्रस्तांना चोहोबाजूंनी मदतीचा ओघ येत आहे. जीवनावश्यक वस्तू, कपडे यांच्याऐवजी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वस्तू पाठवण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेने केले आहे. फिनेल, मास्क, हॅण्डग्लोव्हज्, प्लॅस्टिकचा खराटा, ब्लिचिंग पावडर, औषध, डेटॉल, अंतर्वस्त्र, लहान मुलांचे डायपर, जंतुनाशक, फावडे, घमेले, कापूर, धूप, गमबूट या वस्तू पूरग्रस्तांसाठी पाठवाव्यात, असे नाट्यपरिषदेने सांगितले आहे. बोरिवलीकरांनी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखा, प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, आर्ट गॅलरी, बुकिंग खिडकीच्या बाजूला, बोरिवली पश्चिम येथे वस्तू पाठवाव्यात.