प्रत्येक अक्षर तीनदा दिसतंय, चुकलं तर माफ करा!

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या शस्त्रक्रियेची माहिती काल ब्लॉगवरून दिली होती. पण कधी आणि कोणती शस्त्रक्रिया याबद्दल ब्लॉगमध्ये काही सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. पण सोमवारी सकाळी अमिताभ यांनी याबाबत खुलासा केला. त्यांनी ब्लॉग लिहून एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. तसेच आपल्यासाठी प्रार्थना करणाऱया चाहत्यांचे आभार मानले.

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय, ‘तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. या वयात डोळ्याची शस्त्रक्रिया करणं खूप नाजूक आणि कौशल्याचं काम असतं. या बाबतीत सर्वोत्तम उपचार मला मिळालेले आहेत आणि सगळं व्यवस्थित असल्याची मी आशा करतो. माझी दृष्टी आणि बरं होण्याचा वेग जरा कमी आहे, त्यामुळे या पोस्टमध्ये काही चुका असू शकतात. त्याबद्दल मला समजून घ्या’. अमिताभ यांनी पुढे म्हटलंय, मला प्रत्येक शब्दाची तीन- तीन अक्षरं दिसत आहेत. मी प्रत्येक वेळी मधले बटण दाबत आहे. त्यांनी आपल्या या स्थितीचे वर्णन माजी क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेशी केले आहे.

दुसऱया डोळ्यावरही लवकरच शस्त्रक्रिया

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती दिली आहे. बरे होण्याचा वेग कमी आहे. आणि दुसऱया डोळ्याचीही शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. जर सगळं व्यवस्थित पार पडलं तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच काम सुरू करू शकेन, ज्याचे नाव सध्या तरी ‘गुड बाय’ असे आहे,’ असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या