Ranji Trophy Final – इतिहास घडला! कर्नाटकला नमवून जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच ‘रणजी’ चॅम्पियन!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या संघाने रणजी करंडक 2025-26 च्या अंतिम सामन्यात आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव करून इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरने 66 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. शुभम पुंडीर याला प्लेअर ऑफ मॅच, तर आकिब नबीला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले.

दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही हजेरी लावली होती. विजयानंतर त्यांनी जम्मू-कश्मीरच्या खेळाडूंचा जल्लोष करतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत जम्मू-कश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केल्या होत्या. शुभम पुंडीरने 121 धावांची शतकी खेळी करत जम्मू-कश्मीरला धावांचा डोंगर उभारून दिला होता. त्यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्नाटकचा संघ पहिल्या डावात केवळ 293 धावांत गारद झाला. जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने अचूक टप्प्यावर मारा करत 5 बळी घेतले आणि आपल्या संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. कर्नाटककडून अनुभवी फलंदाज मयंक अग्रवालने 160 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही.

पहिल्या डावात 291 धावांची आघाडी मिळाल्यानंतर, जम्मू-कश्मीरने दुसऱ्या डावातही आपले वर्चस्व कायम राखले. कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर त्यांनी आपली एकूण आघाडी 633 धावांपर्यंत नेली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हा सामना अनिर्णित राहिला. मात्र, रणजी करंडकाच्या नियमानुसार पहिल्या डावात घेतलेल्या महत्त्वपूर्ण आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले.