
नांदेड येथील सरकारी रुग्णालयात गेल्या 48 तासात 35 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांतच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या दोन्ही घटना ताज्या असतानाच मिंधे गटाचे गद्दार खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मिंधे भाजप सरकारवर टीका केली आहे.
”शिंदे गटाचे खासदार हेमंतजी पाटील यांनी नांदेड रुग्णालयातील अधिष्ठाता यांना शौचालय स्वच्छ करायला लावणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार आहे. जर डीनला ही शिक्षा तर सार्वजनिक आरोग्यविभाग हाताळणाऱ्या मान. मंत्रीमहोदय तानाजी सावंत व राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांना जाब विचारणार की स्वपक्षीय म्हणून कानाडोळा करणार? असा सवाल अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून केला आहे.
”ठाणे, नांदेड आणि आता छ. संभाजीनगर येथे झालेले रुग्णालयातील मृत्यू वेदनादायक आहेत. कोरोना काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेने देशात मान उंचावली होती, त्या महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था असे आचके देऊ लागली तर जबाबदारी कुणाची?” असा सवालही त्यांनी ट्विटरवरून केला आहे.
”जनतेच्या कराच्या कोट्यवधी रूपयांची जाहिरातबाजीत उधळपट्टी करण्यापेक्षा डॉक्टरांची कमतरता, औषधांचा पुरवठा, तंत्रसामग्रीची पूर्तता कोणी करायला हवी?” असेही त्यांनी या ट्विटमधून सुचवले आहे.



























































