सर्बोनाश! अम्फन वादळाने केलेल्या नुकसानावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

1565

पश्चिम बंगालमध्ये अम्फन वादळाने हाहा:कार माजवला आहे. तिथल्या काही इमारती पडल्या असून, वीजेच्या तारा आणि रस्ते यांचेही मोठे नुकसान झाले आहे.  पश्चिम बंगालमधील हा ‘सर्बोनाश’ म्हणजेच सर्वनाश आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. बुधवारी रात्री कंट्रोल रुममधून राज्यातील  परिस्थितीचा त्या आढावा घेत होत्या. हा आढावा घेत असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. या वादळामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

NDTV ने याबाबत वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की राज्यात अम्फन वादळामुळे सर्वनाश झाला असल्याचे उद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले.  अम्फन वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हे संकट कोरोनापेक्षा मोठे असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘सध्या मी वॉर रूममध्ये बसले असून आमचे ऑफिसही या वादळामुळे हलत आहे, ही युद्धजन्य परिस्थिती हातळताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे’  असेही बॅनर्जी म्हणाल्या

बंगालच्या किनारपट्टी भागाला आणि 24 परगणा जिल्ह्याला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहत आहेत. यामुळे झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब काड्या हवेत भिरकावल्या सारखे दूरवर फेकले गेले आहेत. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोलकात्यात 125 किमी वेगाने वारे वाहत होते आणि यामुळे अनेक भागात झाडं पडून मालमत्तेचे नुकसान झाले

वादळाचा वीजपुरवठ्यावरहीर परिणाम झाला असून कोलकाता आणि 24 परगणा जिल्ह्यात वीज गायब झाली आहे.  वादळामुळे मोबाईल टॉवर्स कोसळल्याने त्याचा परिणाम इंटरनेट आणि टेलिकॉम सेवांवरही झाला आहे. दिघा आणि सुंदरबन भागात संपर्क तुटला आहे. पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याची माहिती मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिली आहे. या वादळामुळे राज्यात किमान 1 लाख कोटींचे नुकसान झाले असेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या