
अमरावतीमध्ये मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह कोरोनाचे नवे 82 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 7087 झाली आहे. तसेच काल रात्रीपर्यंत पुन्हा कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतकांची संख्या 153 वर गेली आहे.
मोर्शी-वरुडचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांचा स्वॅब काल दुपारी येथील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आला होता. त्यात भुयार हे पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना लगेच नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. सध्या भुयार यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान काल रात्रीपर्यंत कोरोनामुळे तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अचलपूर तालुक्यातील धोतरखेडा येथील 39 वर्षीय पुरूष दर्यापूर येथील 54 वर्षीय महिला, व खोलापूरी गेट येथील 68 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
सोमवारी 4 वाजेपर्यंत आलेल्या अहवालात कोरोनाचे 82 नवे रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण अमरावती शहरातील किरण नगरात 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे जेल क्वार्टर येथील 6 तर विलास नगर येथे सुद्धा सहा नवे रुग्ण आढळून आले. याव्यतिरिक्त शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोना बाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण परतवाडा येथे 4 आढळून आले. या सोबत वरुड, दर्यापूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे तालुक्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या चार दिवसापासून अमरावती जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. काल जिल्ह्यात 269 रुग्णांची विक्रमी नोंद आली आहे. यापूर्वीच्या गुरूवार शुक्रवार व शनिवारी सुद्धा 200 च्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यामुळे हे सर्व रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.




























































