
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी अमरावतीच्या निवडणूक अधिकारी, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी नुकतीच एक निवडणूक कामकाजाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. निवडणूक होईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन, मतमोजणीची तयारी, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबींवर या वेळी चर्चा करण्यात आली. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त दादाराव डोलारकर, सात झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन उपस्थित होते.




























































