अक्षय प्रेमगाथेचा अमृतानुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

समाजाला प्रश्न विचारण्याचं, आपले बंडखोर विचार लेखणीतून उतरवण्याचं धाडस असणारी लेखिका म्हणजे  अमृता प्रीतम. विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यसंभार असणाऱ्या या लेखिकेने स्त्रीच्या आत्मबलाचं, परिवर्तनाचं एक वेगळं उदाहरण जगासमोर ठेवलं.

अमृता प्रीतम यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या नितळ सच्च्या आणि गहिऱया प्रेमभावनांना मोठं स्थान मिळतं त्या तुलनेत त्यांच्या साहित्याबद्दल कमी लिहिलं जातं. अर्थात मानवी स्वभावाचा भावनिक कल पाहू जाता असं होण्यात काही वावगं नाही. परंतु त्यामुळे साहित्यिक अमृता प्रीतम रसिकांपर्यंत खऱया अर्थाने पोहोचत नाहीत. आजही सच्च्या प्रेमाचा दाखला द्यायचा झाला तर अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी आणि इमरोज यांची नावे सहज समोर येतात.

31 ऑगस्ट 1919 रोजी पाकिस्तानातील गुजाराणवाला इथं अमृतांचा जन्म झाला. यंदाचं वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. आधुनिक कालखंडातील ख्यातनाम पंजाबी कवयित्री, लेखिका आणि विद्रोही रचनाकार असा त्यांचा साहित्य जगातला सार्थ लौकिक आहे. त्यांचं मूळ नाव अमृतकौर असं होतं तर त्यांच्या पतीचं नाव प्रीतम सिंह कातवाडा असं होतं. अमृतांच्या नावाशी जुळलेला प्रीतम हा शब्द त्यांच्या पतीच्या नावातलाच होता. पतीसोबत त्या फार काळ एकत्र राहू शकल्या नाहीत. फाळणीची झळ बसून त्या लाहोर सोडून दिल्लीस आल्या होत्या. त्यांचे वडील कर्तार सिंह हितकारी हे उत्कृष्ट कवी होते. त्यांच्या काव्याचा प्रभाव पडून वयाच्या सोळाव्या वर्षांपासून अमृता प्रीतम यांनी काव्यरचनेस आरंभ केला.

‘अमतलहरे’हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1936 मध्ये प्रकाशित झाला. दिल्लीत आकाशवाणीमध्ये त्यांनी 1948 ते 1960 पर्यंत स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरी केली. या काळात त्यांनी आकाशवाणीसाठी गीत, रूपक इ. स्वरूपाचं लेखन केलं. त्यांची सुरुवातीची रचना पारंपरिक धाटणीची होती. त्यातून बाहेर पडत काही काळातच स्वतःच्या प्रगाढ अनुभूतीमुळे व वैयक्तिक भावना व्यक्त करण्याच्या उत्कट इच्छेमुळे त्यांच्या काव्यात एक परिवर्तन घडलं. स्त्रियांची बाजू त्या हिरिरीने मांडू लागल्या. स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व पारंपरिक मूल्यांविरुद्ध बंड पुकारले. अमृतांच्या लेखनात त्यांचं व्यक्तिगत आयुष्य सातत्याने डोकावत राहतं. पतीला सोडून आल्यानंतर त्या साहिरच्या प्रेमात पडल्या, साहिरनीदेखील त्यांच्यावर जिवापाड प्रेम केलं. मात्र आपल्या दोघांचाही मार्ग एक नाही हे उमगल्यावर साहिर अमृतांच्यासोबत जीवनसाथी म्हणून राहू शकले नाहीत, पण त्याचवेळेस स्वतःच्या सच्च्या प्रेमाला उत्तुंग पातळीवर नेत ते ब्रह्मचारी राहिले. तर आपल्याहून कितीतरी वर्षे लहान असणाऱ्या इमरोजसोबत अमृतांनी आयुष्य व्यतीत केलं, पण एकाच छताखाली राहून देहभान जपलं. एका स्त्रीच्या जीवनात पुरुषजीवनाचे इतके कंगोरे क्वचितच पाहण्यात येतात कदाचित त्यामुळेच अमृतांच्या लेखणीत स्त्रियांचा आवाज व्यक्त होत गेला.

त्यांचे तेरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘में त्वारिख हाँ हिंद दी !’या दीर्घ काव्यात त्यांनी फाळणीची दारुण व्यथा व्यक्त केली. ‘सरघी वेला’ (1951) या संग्रहात मानवी मनातील अत्यंत तरल आणि कोमल भावभावना कलात्मकरीत्या व्यक्त करण्यात आल्या असून त्यांनी या संग्रहात त्यांच्या प्रतिभेची उच्च पातळी दिसून येते. अमृतांच्या कवितेत सर्वव्यापी असणारा ओज हा गुण त्यांनी भोगलेलं वास्तव, सद्यपरिस्थिती तसेच सर्व प्रकारची दडपशाही व बंधने झुगारून देण्याच्या वृत्तीतून व त्यांच्या दुर्दम्य विद्रोही इच्छेमधून आलेला आहे. अनेकदा असं वाटतं की, त्यांच्या लेखनातून सर्वसामान्य हिंदुस्थानी महिलांचा आवाजच प्रकट झालाय. त्यांचं लेखन जेव्हा जेव्हा या विषयावर साकारलं गेलंय तेव्हा तेव्हा त्या वाचकांच्या अंतःकरणात उतरून मनाचा धांडोळा घेण्यात यशस्वी ठरतात.

उच्च श्रेणीतील कादंबरीकार म्हणूनही त्या पंजाबी साहित्यात विख्यात आहेत. कविता संग्रहाप्रमाणेच त्यांच्या कादंबऱया प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांनी त्यांना आपल्या डोक्यावर घेतलं होतं. कादंबरीच्या शैलीचा आस्वादक दृष्टीने विचार करता जाणवते की, या सर्व कादंबऱया काव्यात्मकी स्वरूपाच्या आहेत. आरंभीच्या कादंबऱयांतून हिंदुस्थानी स्त्रियांवरील शतकानुशतकांच्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली ‘आलना’ या कादंबरीत अनौरस, अनाथ बालकांसाठी आश्रम स्थापन करावेत असे त्यांनी सुचविले आहे. कादंबरी लेखन त्यांनी बऱयापैकी केलं असलं तरी त्या खुलतात ते कवितांच्या दुनियेतच!

त्यांनी पुष्कळ लघुकथाही लिहिल्या आहेत. या कथांमधूनही त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली आहे. ‘चाबी वरे बाद’ (1943), ‘कुंजिअन’ (1944), ‘आखरी खत’ (1956), ‘गोजर दिअन परिअन’ (1960) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत. कविता, कादंबरी, कथा या साहित्यप्रकारासह त्यांनी ललित लेखनही केलं आहे. वय वाढते तशा जाणिवा प्रगल्भ होत जाणं हे सुज्ञ आणि सृजनतेचं दार्शनिक आहे. अमृतांच्या साहित्यात एका कलाकाराच्या विकासाचा आलेख स्पष्ट दिसून येतो. सुरुवातीला स्वतःच्या भावनांविषयी त्यांनी लिहिले नंतर मातृभूमीविषयीच्या भावनांचा आविष्कार त्यांच्या साहित्यात झाला व शेवटी अखिल मानवजातीच्या भावनांचे पडसाद त्यांच्या साहित्यात उमटले. ‘अज आखाँ वारिस शाह नूँ’ या त्यांच्या कवितेने तर त्यांना पंजाबी साहित्यात अजरामर बनविले. ‘बदलां दे पले विच’ (1943), ‘लंबियां वाटां’ (1949), ‘मौली ते महंदी’ (1955), ‘सरघी वेला’ (1951), ‘अशोक छेती’ (1957) व ‘चानंन दा हौका’ (1962) हे त्यांचे उल्लेखनीय प्रकाशित काव्यसंग्रह होत. ‘डॉ. देव’ (1949), ‘आलना’ (1952) या कादंबऱ्या. याव्यतिरिक्त त्यांनी ‘पंजाबी साहित्य दा इतिहास’ हा साहित्येतिहास-ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्या साहित्यावर ‘कलम दा भेत’व ‘अमृता प्रीतम दी चौनवी कविता’ हे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही साहित्यकृतींची हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती व उर्दू या भाषांत भाषांतरे झाली आहेत. अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटिने त्यांच्या साहित्यावर ‘महफिल’ नावाचा एक खास ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. दिल्लीमधून निघणाऱ्या ‘नागमणी’ या पंजाबी मासिकाच्या संपादिका म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. 1982 साली त्यांना साहित्य क्षेत्रातील ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं. साहित्य अकादमीने 1956 मध्ये आणि पंजाब सरकारने 1958 मध्ये त्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे.

केवळ शाब्दिक बुडबुडे न सोडता आपल्या विचारांना आपल्या जीवनात प्रभावीपणे अमलात आणल्यामुळे अमृतांचे नाव हिमालयासारखे उत्तुंग आणि भव्य झाले आहे. किमान एकदा जरी त्यांचं साहित्य रसिक वाचकाने वाचलं तर त्याच्या जीवनविषयक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडून येतो. हे यश अमृतांच्या अक्षय प्रेमगाथेच्या ‘अमृता’नुभवाचंच आहे.

[email protected]