
अमृतसर नजीक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी तस्करांचं ड्रोन पाडण्यात बीएसएफला यश आलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हे ड्रोन पाडल्यानंतर त्यातून 21 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे.
अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर म्हणजेच अटारी येथील रत्नखुर्द येथे हे ड्रोन पाकिस्तानकडून घुसखोरी करत होतं. सुमारे पावणे दहाच्या सुमाराला ड्रोनचा आवाज ऐकून बीएसएफच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांतच ड्रोनचा आवाज येणं बंद झालं. त्यानंतर जवानांनी घेतलेल्या शोधमोहिमेत अटारी येथील शेतामध्ये ड्रोन पडलेला आढळला.
या ड्रोनसोबत पिवळ्या रंगाची पिशवी होती. ती ताब्यात घेऊन तिची तपासणी करण्यात आली. त्यातून हेरॉईन हा अंमली पदार्थ सापडला. तो जवळपास 3.2 किलो इतकं होतं. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 21 कोटी इतकी आहे. या महिन्यातील हे पहिलं ड्रोन असून जवानांनी यापूर्वीही असे अनेक ड्रोन पाडले आहेत.























































