
ठाण्यातील घोडबंदर रोडवरून न्हावाशेवाकडे निघालेला कंटेनर वाघबीळ उड्डाणपुलावर दुभाजकाला धडकून उलटला. हा अपघात आज पहाटे ५ वाजता घडल 1. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातग्रस्त कंटेनरमधील तेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याने त्याचा परिणाम ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर झाला. दुपारपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती.
कंटेनरचालक ग्यानेंद्र सिंग हे दिल्ली येथून कंटेनर घेऊन ठाण्यातील घोडबंदर रोडमार्गे न्हावाशेवा येथे जात होते. पहाटे पाच ते सवापाच वाजण्याच्या सुमारास ते वाघबीळ उड्डाणपुल ावरून जाताना त्यांचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर दुभाजकाला जाऊन उलटला. अपघातानंतर कंटेनरमधील तेल रस्त्यावर पसरल्याने वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. या अपघाताची माहिती शहर वाहतूक विभागाचे पोलीस दीपक बार्ले यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली.
चार तासानंतर वाहतूक सुरळीत
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तीन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त भलामोठा कंटेनर रस्त्यातून बाजूला केला. अन्य वाहने घसरू नये यासाठी रस्त्यावर पसरलेल्या तेलावर कर्मचाऱ्यांनी माती टाकली. सकाळी ९ वाजता मदतकार्य संपल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
































































