
यूटामधील साल्ट लेक सिटीमध्ये एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना अचानक मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पार्टीसाठी आलेले पाहुणे मगर बघण्यासाठी आले असता मगरीने अचानक हल्ला चढवत देखभाल करणाऱ्या महिलेच्या हात जबड्यात पकडला. त्यामुळे एकच घबराट पसरली.
मुलांना घाबरलेले बघून त्या महिलेने मुलांना धीर दिला. ही मगर आपल्या ओळखीची आहे. तिला आपला लळा आहे. तुम्ही घाबरुन जाऊ नका. आपल्याला आणि मगरीला काहीही होणार नाही, असे तिने सांगितले. प्रसंगावधान राखत एकाने पाण्यात उडी घेतली आणि मगरीच्या पाठीवर चढला. त्यामुळे मगरीने महिलेचा हात सोडला. या घटनेची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.
या घटनेनंतर हँडल बुल आणि स्केल्स अँड टेल्स केंद्रावर टीका होत आहे. मात्र, मगरीच्या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मगरीने केलेल्या हल्ल्यात मगरीची देखभाल करणाऱ्या महिलेच्या हाताला जखम झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही मगर आमच्या केंद्रात सुरक्षित असून तिची योग्य प्रकारे काळजी घेत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यादिवशी संभ्रमित झाल्याने मगरीने हल्ला केल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.
मगरीची देखभाल करणारी महिला तीन वर्षांपासून या डार्थ गेटोर मगरीसोबत आहे. ती या मगरीची योग्य देखभाल करत आहे. या मगरीला योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. ती मगर आपल्या कुटुंबातील असल्याप्रमाणे आपण तिची काळजी घेत असल्याचे महिलेने सांगितले. त्यादिवशी जे घडले, तो निव्वळ अपघात होता. मगर संभ्रमित झाल्याने तिने हल्ला केल्याचे महिलेने सांगितले.
मगरीला बाहेर बोलावल्यावर काहीतरी खाण्यासाठी बोलावल्याचे तिला वाटले आणि तिने आपला हात जबड्यात धरल्याचे महिलेने सांगितले. मात्र, त्यावेळी पाहुण्यांना मगर दाखवण्यासाठी तिला बाहेर बोलवण्यात आले होते. मात्र, काहीतरी खाद्य मिळेल, असा तिचा समज झाल्याने तिने आपला हात जबड्यात पकडला. मगरीच्या हल्ल्यात आपल्या हाताला जखमा झाल्या असून त्यावर उपचार सुरू आहेत. ही मगर या केंद्रात सुरक्षित असून तिची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचेही महिलेने सांगितले.





























































