शिकाऊ चालकाने वृद्ध महिलेला चिरडले, पोयसर येथील घटना

विनापरवाना वाहन चालवणाऱया शिकाऊ चालकाने महिलेला चिरडल्याची संतापजनक घटना पोयसर येथे आज सकाळी घडली. ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्याने हा अपघात झाला. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. मृत महिलेची ओळख पटली नाही. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी सुरेंद्र गुप्ता आणि राजेंद्र गुप्ता विरोधात गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा त्यांना अटक केली.

राजेंद्र हा ओला या गाडीवर चालक म्हणून काम करतो. त्याचा सुरेंद्र हा मित्र आहे. आज सकाळी राजेंद्रने गाडी पोयसर येथे पार्क केली होती. तेव्हा सुरेंद्रने राजेंद्रला गाडी चालवण्यास देण्याची विनंती केली. सुरेंद्रकडे लायसन्स नसतानाही तो गाडी चालवत होता. गाडी पोयसर सब वे येथून एस व्ही रोड येथे आली. सुरेंद्रकडून ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबले गेल्याने गाडी जोरात पुढे गेली. तेव्हा त्या रस्त्यावरून एक वृद्ध महिला पायी जात होती. वाहनाने महिलेला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले. त्यानंतर गाडीने सौरभ यादव आणि प्रवाशकुमार बरल यांना धडक दिली. ते देखील जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच कांदिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी वृद्ध महिलेला आणि सौरभ, प्रवाशकुमार यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी वृद्ध महिलेला मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार करून त्याना घरी सोडण्यात आले. वृद्ध महिलेची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितले.